आरमोरी,
daulat-dhote संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आरमोरी येथील दुर्गा व शारदा उत्सवाला पन्नास वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त नेहरू चौकातील शारदा उत्सव मंडळाने गुजरात राज्यातील द्वारका येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराची भव्य प्रतिकृती आणि भगवान श्रीकृष्णाच्या कालिया मर्दन प्रसंगाचा आकर्षक देखावा साकारला आहे. सुमारे दोन हजार चौरस फूट क्षेत्रात आणि 25 फूट उंचीवर उभारण्यात येत असलेला हा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
नेहरू चौकातील शारदा उत्सव मंडळाने गेल्या 36 वर्षांपासून धार्मिक, पौराणिक आणि सांस्कृतिक देखाव्यांची परंपरा सातत्याने जोपासली आहे. दरवर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना आणि कलात्मक मांडणीच्या माध्यमातून मंडळ भाविकांचे लक्ष वेधून घेत असते. यंदा द्वारकाधीश मंदिराची भव्य प्रतिकृती आणि भगवान श्रीकृष्णाच्या कालिया मर्दन प्रसंगाची आकर्षक मांडणी करण्यात आली असून, हा देखावा मागील वर्षांच्या तुलनेत अधिक भव्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात नेहरू चौकात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मंडळाच्या वतीने यापूर्वी कुंभकर्ण, नरसिंह अवतार, शंकर तांडव, गोवर्धन पर्वत, स्वर्ग-नरक, बाहुबली, चारधाम, केदारनाथ, बद्रीनाथ, उज्जैन येथील महाकाल आणि जगन्नाथ मंदिर अशा विविध धार्मिक व पौराणिक संकल्पनांवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. या वैभवशाली परंपरेत यंदा द्वारकाधीश मंदिर आणि कालिया मर्दन या दोन धार्मिक प्रसंगांची सांगड घालून भाविकांसमोर भक्ती, पौराणिकता आणि कलात्मकतेचा अनोखा आविष्कार सादर केला जात आहे.
साडेअकरा फूट उंचीची शारदामातेची मूर्ती ठरणार विशेष आकर्षण
यंदाच्या उत्सवात शारदामातेची सुमारे साडेअकरा फूट उंचीची आकर्षक मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहे. ही मूर्ती छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून आणण्यात येणार असून, तेथील प्रसिद्ध मूर्तिकार राजेश चक्रधारी यांनी तिची निर्मिती केली आहे. तसेच, कालिया मर्दनाची मूर्ती मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अंधारे यांनी तयार केली आहे. देखाव्यामध्ये विविध देवी-देवतांच्या जवळपास दहा मूर्तींचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्या कलात्मक मांडणीमुळे संपूर्ण परिसराला धार्मिक आणि उत्सवी स्वरूप प्राप्त होणार आहे. गेल्या 36 वर्षांपासून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत भाविकांना नवनवीन देखाव्यांचा अनुभव देणार्या नेहरू चौकातील शारदा उत्सव मंडळाने यंदाही भव्यतेला कलात्मकतेची जोड दिली आहे. द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती, भगवान श्रीकृष्णाचा कालिया मर्दन प्रसंग आणि शारदामातेची भव्य मूर्ती यांमुळे हा देखावा नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरण्याची चिन्हे आहेत.