‘बेस्ट बिल्डिंग अवॉर्ड’मध्ये शिवा श्री अपार्टमेंट प्रथम

क्रेडाई अमरावतीतर्फे पुरस्कार वितरण

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
अमरावती
credai-amravati दर्जेदार बांधकाम, आकर्षक वास्तुरचना, आधुनिक सुविधा आणि पर्यावरणपूरक संकल्पनांचा संगम साधणाऱ्या वास्तूंचा ‘बेस्ट बिल्डिंग अवॉर्ड-२०२६’ सोहळ्यात गौरव करण्यात आला. अपार्टमेंट श्रेणीत जोग - महाजन इन्फ्राच्या गानूवाडी लेआउट येथील शिवा श्री अपार्टमेंटने प्रथम क्रमांक पटकावला. बंगला श्रेणीत दाभाडे असोसिएट्स, तर व्यावसायिक इमारतींच्या श्रेणीत गोविंदा ग्रुपच्या सेंट्रल व्हिस्टाने बाजी मारली.
 

kredai
 
क्रेडाई अमरावतीतर्फे शुक्रवारी, ९ ऑक्टोबरला सांयकाळी ग्रँड मेहफिल-इनमध्ये हा सोहळा आयोजिण्यात आला होता. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला क्रेडाई महाराष्ट्राचे जॉइंट सेक्रेटरी निलेश ठाकरे, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष राजन पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे यांच्यासह वास्तुविशारद आणि बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
शिवा श्री अपार्टमेंटच्या सुविधांची दखल
गानूवाडी लेआउटमधील शिवा श्री अपार्टमेंटने नियोजनबद्ध रचना आणि आधुनिक सुविधांमुळे अपार्टमेंट श्रेणीत प्रथम क्रमांक मिळविला. सुमारे ७३ सदनिकांच्या या प्रकल्पात प्रशस्त वाहनतळ, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, सभागृह, अतिथी कक्ष, आकर्षक प्रवेशद्वार आणि सौरऊर्जेवर आधारित प्रकाशव्यवस्था आहे. जोग - महाजन समूहाने आतापर्यंत ३५ हून अधिक आधुनिक अपार्टमेंट प्रकल्प उभारले आहेत.
 
अपार्टमेंट श्रेणीत विशालाक्षी ग्रुपच्या सुमेरु वेदांता-२ ला द्वितीय क्रमांक मिळाला. बंगला श्रेणीत अविनाशे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स द्वितीय ठरले. व्यावसायिक इमारतींच्या श्रेणीत सृष्टी इन्फ्राच्या सृष्टी कमर्शियलने द्वितीय क्रमांक मिळविला. मान्यवरांनी बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता, नियमांचे पालन आणि अमरावतीच्या नियोजनबद्ध विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. देवेश विखे यांचा रेडिओडायग्नोसिस विषयातील एमडी पदवी आणि सुवर्णपदकाच्या कामगिरीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी व परीक्षक म्हणून प्रा. राम विघे, अनुपम चवाट, समीर कुलकर्णी उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक अनिल विखे तसेच श्रीकांत धर्माळे शैलेश वानखडे, राम महाजन, महेश जोग, पंकज देशमुख, संजय पर्वतकर, भुषण देशपांडे, सचिन वानखडे, कपिल आंडे, धर्मेंद्र चंदेले, रवींद्र गोरटे, सुदीप पेठे, कमल मालवीय, लक्ष्मीकांत जोशी, नितीन शेंद्रे, प्रवीण ढवळे, आशिष दुधे यांच्यासह अन्य मंडळी हजर होती.