नरेंद्र सुरकार
सिंदी रेल्वे
drought हवामान विभागातर्फे दिल्या जाणार्या सूचना वजा इशार्यांचा विचार करता यंदा सन १९७३ पेक्षाही भयंकर दुष्काळाची चिन्हं स्पष्ट जाणवत आहेत. पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतशिवारांची धुळधाण झालीच आहे! पण, चार महिन्यांनंतर पिण्यासाठी जनतेला मुबलक पाणी तरी मिळेल काय? या काळजीचीच चर्चा आता सर्वत्र पहायला मिळू लागली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे पोळ्यापासून पाऊस कायमसाठीच भोळा झाला. परिणामी, खरीप हंगामातील सर्वच पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. पाण्याअभावी उभी पिकं करपत आहेत. त्यामुळे शेतीसाठी केलेला अमाप खर्च निघण्याची सुतराम शयता दिसत नाही. उलट शेतकर्यांची मेहनत वाया जाण्याची भीती आहे.
यावर्षी खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांची अवस्था मरणासन्न झाली आहे. भर हंगामात पाऊस जेमतेम पडल्यामुळे पिके कशीबशी तग धरून होती. पोळ्यापर्यंत रान हिरवे दिसत होते म्हणून शेतकरी सबुरीने पिकांना जगवत गेला. नदी नाल्यांना पूर गेला नसल्यामुळे विहिरींमधील पाण्याची पातळी दररोज कमी होत गेली. आज कृषिपंप दोन तास अखंड चालविणे शय नसल्याचे शेतकरी सांगतात. पिकांची वाढ खुंटली असून फळधारणा होतांना दिसत नाही. फत सोयाबीन उत्पादक पोषक पावसामुळे समाधानी दिसतात. कापणी झालेल्या सोयाबीनची सरासरी एकरी ६ क्विंटलची नमूद केल्या जात आहे. आजघडीला शेतातील सर्वच पिकांना पावसाची नितांत गरज असून शेतकरी विहिरीवरून किंवा शेततळ्यावरून पाणी देण्याचे नियोजन करीत आहेत. पाण्याची पातळी अभूतपूर्व खोल गेल्यामुळे विहीर आणि शेततळ्यात अत्यल्प जलसाठा दिसतो. परिणामी, पिकांचे सिंचन करणे जमत नाही, अशी ओरड आहे.
पिकांना पाण्याची गरज असताना पर्यायी व्यवस्था म्हणून धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. खरीप हंगाम दुष्काळात संपल्यात जमा असून रब्बी हंगामात पावसाची खात्री नाही! वृद्ध शेतकरी १९७३ च्या दुष्काळातील भयावह स्थितीबद्दल सांगताना त्यासाली सरकारने पी.एल. ४८० करार करुन जनतेला धान्य उपलब्ध करुन दिले होते. आता, परिस्थिती सुधारली आहे, एवढाच काय तो फरक! सरकार ही विदारक परिस्थिती बघून जनतेनी पाणी काटकसरीने वापरावे, असे सांगत आहे. विविध रोगांनी उभ्या पिकांवर आक्रमण केल्यामुळे कपाशीसह इतरही वाणांचे उत्पन्न हाती लागण्याची शयता नाही, एवढे नक्की!
शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे त्या तोकड्या मदतीवर जगायचे कसे? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यंदा, शेतमालांना भक्कम दाम मिळणार असेल तरी त्याचा लाभ बळीराजाला मिळणार नाही.