समता, स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवा: आ.बडोले

‘पाण्याने पेटला वणवा’तून महाडच्या जलक्रांतीला रंगमंचावर उजाळा

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
mla-badole महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा ऐतिहासिक संघर्ष, सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा संदेश ‘पाण्याने पेटला वणवा’ या ऐतिहासिक मराठी नाटकातून रंगमंचावर जिवंत झाला आहे. आमदार इंजी. राजकुमार बडोले लिखित या नाटकाच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्‍याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाटकातील ऐतिहासिक प्रसंग, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला संघर्ष यांचे प्रभावी चित्रण पाहून प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून नव्या पिढीने अशा ऐतिहासिक नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून समता, स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी केले आहे.
 
 
mla-badole
 
२० मार्च १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्याचा अधिकार नाकारलेल्या समाजाला समान हक्क आणि मानवी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी हा ऐतिहासिक संघर्ष उभारण्यात आला. हा लढा केवळ पाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायासाठीची क्रांतिकारी चळवळ होती. आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या ऐतिहासिक संघर्षाचे नाट्यरूपांतर करून त्यामागील सामाजिक वास्तव, अन्यायाविरुद्धचा एल्गार आणि बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार प्रभावीपणे मांडला आहे. इतिहासातील प्रेरणादायी घटना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक समतेची मूल्ये रुजविणे, हा या नाटकाचा प्रमुख उद्देश आहे.
 
 
इतिहासाचे स्मरण म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांची उजळणी नव्हे, तर त्यातून समता, बंधुता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आत्मसात करणे होय. महाडच्या सत्याग्रहातून मिळालेला संदेश आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे नव्या पिढीने अशा ऐतिहासिक नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा इतिहास समजून घ्यावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन आ. बडोले यांनी केले आहे. पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यातील अहिल्यानगर येथील प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद हा महाडच्या जलक्रांतीचा इतिहास आणि समतेचा विचार आजही समाजमनात महत्त्वाचे स्थान राखून असल्याचे अधोरेखित करणारा ठरला. या ऐतिहासिक संघर्षाचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांनी ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.