तिलकचा विक्रम, कोहलीला टाकलं मागे!

    दिनांक :10-Oct-2026
Total Views |
रांची,
tilaks-record भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या नावावर एक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला आहे. रांची येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिलकने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १८ चेंडूंमध्ये नाबाद ४४ धावा केल्या. या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमधील पाच हजार धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, ४० पेक्षा अधिक फलंदाजीची सरासरी आणि १४० पेक्षा जास्त स्ट्राइक रेट राखत हा टप्पा गाठणारा तो पहिला खेळाडू ठरल्याची नोंद आहे.
 
tilaks-record
 
तिलकने आपल्या टी-२० कारकिर्दीतील १७५ व्या सामन्यात ही कामगिरी केली. त्याने आतापर्यंत १६६ डावांमध्ये फलंदाजी करताना ४१.५७ च्या सरासरीने एकूण ५,०३१ धावा जमवल्या आहेत. त्याच्या खात्यात पाच शतके आणि ३० अर्धशतकांची नोंद असून, त्याचा स्ट्राइक रेट १४५.३६ इतका आहे. मधल्या फळीत खेळताना संघाला गरज असलेल्या वेळी धावांचा वेग वाढवण्याची क्षमता तिलकने अनेकदा दाखवून दिली आहे.
 
पाच हजार धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्याच्या बाबतीतही तिलकने भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. तिलकने १६६ डावांत हा टप्पा गाठला, तर कोहलीला त्यासाठी १६७ डाव खेळावे लागले होते. त्यामुळे या कामगिरीत तिलकने कोहलीपेक्षा एका डावाची आघाडी घेतली आहे.
 
भारतीय खेळाडूंमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत पाच हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने १४३ डावांत हा टप्पा गाठला. ऋतुराज गायकवाडने १४५ डावांत, शुभमन गिलने १५४ डावांत आणि अभिषेक शर्माने १६५ डावांत पाच हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर १६६ डावांसह तिलक वर्माचा क्रमांक लागतो, तर विराट कोहलीने १६७ डावांत ही कामगिरी केली आहे.
 
तिलकच्या या कामगिरीमुळे टी-२० क्रिकेटमधील त्याची सातत्यपूर्ण फलंदाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कमी डावांत पाच हजार धावांचा टप्पा गाठण्याबरोबरच चांगली सरासरी आणि आक्रमक स्ट्राइक रेट कायम राखणे, ही त्याच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय बाब ठरली आहे.