सिंदी (रेल्वे),
crop-damage शासनाने सरसकट नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असले तरी कर्मचारी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावत आहेत. महसूल यंत्रणेतील चतुर कर्मचार्यांनी उंटावरुन शेळ्या हाकलणे सुरु केले. अनेक राजस्व निरीक्षक, तलाठी मंडळींनी बसल्या जागी अहवाल तयार केल्याचा आरोप खुलेआम होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळेअभावी पंचनामे करा, पण सरकार सरसकट आर्थिक मदत देण्यास कटिबद्ध आहे, असे जाहीर केले. नेमका हाच धागा पकडून या भागातील अनेक शेताच्या बांधावर न जाता ग्रामपंचायतमध्ये बसून किंवा एखाद्या ढाब्यावर बसत पंचनाम्यांचा अहवाल केल्याचा आरोप हिवरा शिवारातील विजय उराडे यांच्यासह शेतकर्यांनी केला आहे. विजय उराडे यांनी गत आठवड्यात तहसिलदार सेलू व उपविभागीय अधिकारी वर्धा यांची भेट घेऊन बांधावर कोणीच आले नाही आणि अद्याप आमच्या शेतांचे पंचनामे झाले नसल्याची तक्रार केली होती. परिणामी, बुधवार ८ रोजी महसूल विभागाच्या चमूने हिवरा ग्रामपंचायतमध्ये बसून कागदोपत्री पुर्तता केल्याचा आरोप करण्यात आला.