पोलिसाच्या वेशेतील दुर्गेने वाचवले दिव्यांग वृद्ध प्रवाशाचे प्राण

अकोला स्थानकावर नवजीवन एक्सप्रेस मधील प्रकार: महिला आरपीएफ अधिकाऱ्याची सतर्कता

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
अकोला,
police-officer ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत येथील रेल्वे बलाच्या कर्मचाऱ्यांचे कर्तव्यनिष्ठा धैर्याचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले असून अकोला रेल्वे स्थानकावर एका दिव्यांग वृद्धाचे प्राण वाचवून कर्तव्यावर असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षकाने धाडस दाखविले.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या रूपातील या दुर्गेने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होते.
 
police-officer
 
रविवार, १० रोजी अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून गाडी क्रमांक १२६५५ नवजीवन एक्सप्रेस निघत असताना एका दिव्यांग वृद्ध प्रवाशाने धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व धावत्या रेल्वेमधील मोकळ्या जागेत घसरून पडू लागले. कर्तव्यावर तैनात असलेल्या सतर्क महिला सहाय्यक उपनिरीक्षक सोनल इंगळे यांनी ही परिस्थिती त्वरित ओळखली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, त्यांनी प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली व तेथे उपस्थित इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांनी वृद्ध प्रवाशाला घट्ट पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मच्या दिशेने बाहेर खेचले. या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रवाशाला किरकोळ खरचटले आहे.
 
 
सुरक्षित बाहेर काढल्यानंतर विचारपूस केली असता, प्रवाशाने आपले नाव दीपक शालिग्राम सदांशिव (वय ६३ वर्षे), रा. आनंद नगर, सेमाना रोड, नवेगाव कॉम्प्लेक्स, गडचिरोली असे सांगितले. त्यांच्याकडे अकोला ते चंद्रपूर प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या आरपीएफ महिला अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे वृद्ध प्रवाशाने आभार मानले व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.