काठमांडू,
Floods again in Nepal नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्तींचे संकट पुन्हा गडद झाले असून, गोरखा जिल्ह्यात बुढी गंडक नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या या पुरात चिखल, दगड आणि मोठी झाडे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आली. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांमधील घरे, पूल आणि इतर बांधकामांचे नुकसान झाले. दोभान, घाट्टेखोला, जगत, सल्लेरी, चुमानुबारी आणि धारचे या ग्रामपंचायतींना पुराचा मोठा फटका बसला आहे. चुमानुबारीला न्याकचेत-सिर्दिबासशी जोडणारा पूलही वाहून गेला. गोरखा जिल्ह्याचे मुख्य जिल्हा अधिकारी धर्मेंद्र कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भागांमध्ये अंदाजे १०० घरे पुरात वाहून गेली असण्याची शक्यता आहे. याशिवाय लहान-मोठे मिळून सुमारे अर्धा डझन पूल खराब झाले आहेत. सल्लेरी येथे बांधकाम सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बेस कॅम्पचेही मोठे नुकसान झाले असून, तो पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. मात्र, जीवितहानी आणि एकूण आर्थिक नुकसानीची निश्चित आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नेपाळमध्ये बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्या सूचनेनुसार बचाव मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पुराचा इशारा जारी केला. चुमानुबारी ग्रामीण नगरपालिका-६ परिसरात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांना बुढी गंडक नदीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्रिशुली दोभानपर्यंत नदीच्या परिसरात जाणे टाळावे आणि पाणी ओसरेपर्यंत सुरक्षित, उंच ठिकाणी थांबावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना संभाव्य धोक्याची माहिती देण्यात आली असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत नदीजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नेपाळला यापूर्वी २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुराच्या संकटातून सावरण्याचे आव्हान असतानाच पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या आपत्तीमुळे भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांच्या काठावरील भागांचे मोठे नुकसान झाले होते. रसुवा, नुवाकोट, धादिंग आणि चितवन या जिल्ह्यांनाही त्याचा फटका बसला होता. आता गोरखा जिल्ह्यातील बुढी गंडक नदीच्या पुरामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.