‘दशमी’त गौरी इंगवलेचा दुर्गावतार

अन्यायाविरुद्ध लढ्याची ठिणगी

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
मुंबई
gauri ingawale रावणाचा वध झाला, महिषासुराचा संहार झाला; मात्र आधुनिक काळातील अन्याय आणि अधर्माविरोधात लढण्यासाठी आज कोण उभे राहणार, हा प्रश्न कायम आहे. याच प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून पारंपरिक ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या संकल्पनेला आजच्या सामाजिक वास्तवाची जोड देण्यात आली आहे.
 

gauri ingawale as durga in marathi film ‘dashami’ releasing on october 23 
‘दशमी’मधील ‘चंडिका हो’ हे गाणे सध्या विशेष चर्चेत आले असून, अभिनेत्री गौरी इंगवलेचा दुर्गावतार त्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. लाल वस्त्र परिधान केलेली, कपाळावर कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्यांची माळ, चेहऱ्यावर तीक्ष्ण नजर आणि हातात अधर्माविरोधात लढण्याचा निर्धार दर्शविणारी प्रज्वलित ज्योत अशा प्रभावी रूपात गौरी या गाण्यात दिसणार आहे. तिच्या या रूपातून स्त्रीशक्ती, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि आदिशक्तीच्या जागराचा प्रभावी संगम साकारला आहे.
सुरेश पंडित यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले ‘चंडिका हो’ हे गाणे असून, त्याला जसराज जोशी यांनी स्वरसाज दिला आहे. गाण्यात गौरी इंगवलेचा रौद्र, गूढ आणि सामर्थ्यशाली अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘दुर्गा ही केवळ पूजनीय शक्ती नसून अन्यायाविरोधात उभी राहणारी ताकद आहे’, हा विचार या गाण्यातून अधोरेखित केला जातो. त्यामुळे गाण्याची दृश्यात्मक मांडणी आणि गौरीचा प्रभावी अवतार चित्रपटाच्या कथानकाबद्दलची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे.
२३ ऑक्टोबरला प्रदर्शित gauri ingawale होणाऱ्या ‘दशमी’मध्ये गौरी इंगवलेसोबत मकरंद अनासपुरे, विजय निकम, महेश मांजरेकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर आणि राज कुंदन यांच्या भूमिका आहेत. दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश हेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विविध अनुभवी कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या कलाकारांची फळीही लक्षवेधी ठरली आहे.विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘दशमी’ केवळ मनोरंजन आणि थरारापुरता मर्यादित न राहता आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर या दोन मुद्द्यांना चित्रपटातून अधोरेखित केले जाणार आहे. त्यामुळे पौराणिक प्रतीकांचा आधार घेत समकालीन वास्तवाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘दशमी’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे.