"ज्ञानेश्वरी"तील शकीना यांना नवरात्राच्या पहिल्याच दिवशी कन्यारत्न!

तुमसर रोड रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
भंडारा 
gyaneshwari express passenger तुमसर आदिशक्तीच्या आराधनेचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्राला आजपासून प्रारंभ झाला असून, नवरात्राच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन झाले. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये प्रवासा दरम्यान गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तुमसर रोड रेल्वे स्थानकावर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेमुळे महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले. तेथे तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी कन्यारत्नाचे आगमन झाल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 

gyaneshwari express passenger shakina khatun gives birth to baby girl on navratri day 1 
मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी गाडी क्रमांक १२१०१ ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या बी-५ डब्यातून एकटीने प्रवास करणाऱ्या शकीना खातून यांना प्रवासा दरम्यान प्रसूती वेदना सुरू झाल्या. याची माहिती मिळताच तुमसर रोड रेल्वे सुरक्षा उपनिरीक्षक एस. एस. ढोके आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शकीना खातून यांना तुमसर रोड रेल्वे स्थानकावर उतरवून तातडीने उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे दाखल करण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली सकाळी ११.४५ वाजता त्यांची सुखरूप प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. सध्या माता आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक
प्रवासादरम्यान अचानक उद्भवलेल्या या प्रसंगात रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता महत्त्वपूर्ण ठरली. योग्य वेळी मदत मिळाल्याने महिलेला तातडीने रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले. कर्तव्यदक्षता, माणुसकी आणि प्रसंगावधान यांचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेचे कौतुक होत आहे.एकीकडे शारदीय नवरात्रात देवीच्या शक्तीची आराधना सुरू झाली असताना, कन्यारत्नाचे आगमन झाल्याने या हा दिवस आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरला आहे.
....