मालेगाव,
navdurga festival मालेगाव तालुक्यात नवदुर्गा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मालेगाव, जऊळका रेल्वे आणि शिरपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध नवदुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. शहरांसह ग्रामीण भागातही नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव शहरात २२, तर ग्रामीण भागात ३५ नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीची स्थापना केली आहे. त्यामुळे मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ५७ मंडळांकडून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.जऊळका रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. जऊळका रेल्वे गावात तीन, राजा किन्ही गावात तीन, तर इतर ग्रामीण भागात २० नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. या परिसरात एकूण २६ मंडळांकडून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागातील २४, तर शिरपूर शहरातील १४ मंडळांनी देवीची स्थापना केली आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील १८ गावांमध्ये ‘एक गाव, एक नवदुर्गा उत्सव मंडळ’ या उपक्रमांतर्गतही उत्सव साजरा केला जात आहे. शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३८ मंडळे नवरात्रोत्सवात सहभागी झाली आहेत.
तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १२१ मंडळे
मालेगाव, जऊळका रेल्वे आणि शिरपूर या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण १२१ नवदुर्गा उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींची स्थापना केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पुढील दिवसात विविध मंडळांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत नवरात्रोत्सवामुळे उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.