अकोला,
akola शहरातील रजपूतपुरा भागातील दोन मजली इमारतीचा काही भाग पडून मलब्याखाली दबलेल्या चार मुलींना सुखरूप काढण्यात स्थानिक नागरिकांना यश आले असून एका मुलीच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने तिला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार अनुप धोत्रे व महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

महानगरपालिकेच्या मोटर वाहन विभागाच्या मागे असलेल्या रजपूतपुरा भागात प्रकाश यादव यांच्या मालकीची दोन मजली इमारत आहे.याच इमारतीत प्रमोद मोहनलाल पांडे परिवारासह राहतात.रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास नियमित प्रमाणे दुकान उघडण्यासाठी जात असताना राहत असलेल्या इमारतीचा बराच भाग कोसळला ढिगार्याखाली मानसी, मानवी, सांची व तृप्ती या चारही मुली दबल्या गेल्या. या भयंकर प्रकारामुळे पांडे यांनी आरडा-ओरड केली असता स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन होईल तशी मदत केली व ढिगाऱ्याखाली दबलेल्या चारही मुलींना सुखरूप बाहेर काढले मात्र यातील एका मुलीचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तिला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार इमारतीचे बांधकाम फार जुने नव्हते मात्र ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली? हे जनतेपुढे समोर येणे गरजेचे असून या घटनेमुळे या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खासदार अनुप धोत्रे यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती होताच खासदार अनुप धोत्रे यांनी राजपूत पुरा भागात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. व परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली. याशिवाय जखमींना उपचारासाठी सुरक्षा रुग्णालयात संदर्भित केले. याशिवाय महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत या ठिकाणी युद्ध पातळीवर मलबा हटवण्याचे काम केले.
शहरातील शिकस्त इमारतीचा प्रश्न ऐरणीवर
मनपा क्षेत्रातील चारही झोन अंतर्गत २२५ शिकस्त इमारत धारकांना मनपा झोन कार्यालयांव्दारे इमारत स्वतःहून बांधकाम पाडणे संदर्भात जुलै महिन्यात नोटीस देण्यात आल्या होत्या,मात्र इमारत निष्काशीत करण्यात आल्या नसल्याने मनपाने इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन हा खर्च संबंधित इमारतधारकांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.मात्र त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.