राजगडावर पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

पाली दरवाजाजवळ चक्कर येऊन कोसळला

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
पुणे
rajgad पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या ३४ वर्षीय पर्यटकाचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर (रा. फुरसुंगी, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. पाली दरवाजाजवळ ही घटना घडली. तीव्र उन्हामुळे चक्कर आल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे खंडाळकर यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
 

rajgad fort tourist dies after collapsing near pali gate in pune 
मिळालेल्या माहितीनुसार, जिज्ञेश खंडाळकर हे तीन मित्रांसह राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ल्यावरील पाली दरवाजाजवळ असताना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यावेळी त्यांचे मित्र बालेकिल्ल्यावर पोहोचले होते. जिज्ञेश यांच्याबाबतची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी दीपक पिलावरे आणि विशाल पिलावरे, महावितरणचे कर्मचारी शंकर रसाळ आणि चेतन चोरगे तसेच स्थानिक नागरिक आकाश जाधव, सुभाष जाधव आणि लहू यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
जिज्ञेश यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थितांनी त्यांना तत्काळ सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर स्ट्रेचरच्या मदतीने त्यांना राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आले. १०८ क्रमांकावर संपर्क साधून खंडोबा माळावर रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पुढील उपचार आणि कार्यवाहीसाठी त्यांना वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनीही घटनास्थळी भेट दिली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी कुरणकर यांनी तपासणीनंतर जिज्ञेश खंडाळकर यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.
राजगडासह rajgad गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गड चढताना पुरेसे पाणी पिणे, मध्येच विश्रांती घेणे आणि प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यास तातडीने मदत घेणे आवश्यक आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी सांगितले. दरम्यान, गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच प्राथमिक उपचारांची सुविधा असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.