रणजीत सलामीवीरांचा फ्लॉप शो!

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ranji-openers-flop-show देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफीच्या ९२व्या हंगामाला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांना फलंदाजीत छाप पाडण्यात अपयश आले. दुसरीकडे, पृथ्वी शॉने अर्धशतकी खेळी करत लक्ष वेधले, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणले. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव आणि लय मिळवण्याच्या दृष्टीने रणजी ट्रॉफीतील सामने महत्त्वाचे मानले जात आहेत. मात्र, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जयस्वाल आणि राहुल यांची बॅट शांत राहिल्याने त्यांच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी मालिकेपूर्वी चुका सुधारून फॉर्म मिळवण्याची संधी या खेळाडूंकडे आहे.

ranji-openers-flop-show
मुंबई आणि चंदीगड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालला खातेही उघडता आले नाही. अवघ्या १३ चेंडूंचा सामना केल्यानंतर तो शून्यावर बाद झाला. कर्नाटक आणि आंध्र यांच्यातील लढतीत केएल राहुललाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने ११ चेंडूंत केवळ चार धावा केल्या. त्यामुळे दोन्ही अनुभवी फलंदाजांकडून अपेक्षा ठेवणाऱ्या चाहत्यांची निराशा झाली. दरम्यान, महाराष्ट्राचा कर्णधार पृथ्वी शॉ याने फलंदाजीत आपली चमक दाखवली. दिल्लीतील पालम स्टेडियमवर महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात त्याने ७३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. त्याला अंकित बावणे यानेही ५० धावांचा टप्पा ओलांडत चांगली साथ दिली. या दोघांच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या डावाला बळ मिळाले.
बंगाल आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीने प्रभाव पाडला. बंगाल क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या लढतीत शमीने १७ षटकांत २९ धावा देत तीन फलंदाजांना माघारी धाडले. विशेष म्हणजे, त्याने नऊ षटके निर्धाव टाकली. आकाश दीपने १७ षटकांत ७४ धावा देत दोन बळी मिळवले, तर आमिर घनीने १२ षटकांत ४४ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी जयस्वाल आणि राहुल यांच्या अपयशाची चर्चा रंगली असताना पृथ्वी शॉच्या अर्धशतकाने आणि शमीच्या भेदक गोलंदाजीने लक्ष वेधून घेतले. भारतीय खेळाडूंना आगामी सामन्यांमध्ये आपला सूर गवसतो का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.