मुंबई
tukaram mundhe अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधात तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. आता या कारवाईची व्याप्ती थेट बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांपर्यंत पोहोचली आहे. पान मसाला ब्रँडच्या कथित सरोगेट जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तीन बॉलिवूड कलाकारांना एफडीएकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी एफडीएने या तिन्ही कलाकारांना संबंधित जाहिरातींबाबत नोटीस बजावली होती. मात्र, सुरुवातीला काही काळ या नोटिसांना कलाकारांकडून उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर संबंधित कलाकारांनी एफडीएला आपली उत्तरे साद केली. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडत कायदा सर्वांसाठी समान असल्याचा इशारा दिला आहे.
अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित कलाकारांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार आपली बाजू मांडण्याची आणखी एक संधी दिली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. मात्र, याचा अर्थ कारवाईतून कोणाचीही सुटका होईल, असा नसल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित प्रकरणात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६मध्ये बोलताना तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. संबंधित कलाकारांकडून नोटिसांना उत्तरे प्राप्त झाली असून, पुढील कारवाई करण्यापूर्वी एफडीएशी संबंधित घटकांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा म्हणणे ऐकून घेण्याची आणखी एक संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. विभाग आपल्या कायदेशीर अधिकारांच्या कक्षेत राहून काम करत असून, पुढील कार्यवाही लागू असलेल्या कायदेशीर चौकटीच्या आधारे निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पान मसाल्याच्या जाहिरातींमध्ये प्रसिद्ध कलाकार सहभागी होत असल्याच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून कारवाईची मागणी केली जात होती. त्यानंतर एफडीएने या कलाकारांना नोटिसा बजावल्या. आता या प्रकरणात कलाकारांनी जाहिरात करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी अधोरेखित केले आहे.जाहिरातीमध्ये एखाद्या उत्पादनाचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीचीही जबाबदारी असते, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २०२६ मधील कलम २४ तसेच २०१८ मधील जाहिरातविषयक नियमांचा संदर्भ देत त्यांनी जाहिरातीचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवरही संबंधित जबाबदारी येत असल्याचे सांगितले.त्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. कलाकारांनी आपली बाजू मांडल्यानंतर एफडीए या प्रकरणात काय निर्णय घेते आणि पुढील कायदेशीर कारवाईचे स्वरूप काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध व्यक्ती असली तरी कायद्याच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश गेला आहे.