शेडगेच्या तडाख्याने ऑस्ट्रेलियाला ४९ धावांनी धोबीपछाड

    दिनांक :11-Oct-2026
Total Views |
पुदुचेरी,
australia ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात इंडिया ‘अ’ संघाने दमदार कामगिरी करत ४९ धावांनी विजय मिळवला. सूर्यांश शेडगेच्या आक्रमक अर्धशतकासह भारतीय फलंदाजांनी उभ्या केलेल्या धावसंख्येला गोलंदाजांनी योग्य साथ दिली. गुर्जपनीत सिंगने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मात्र, सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. पुदुचेरीतील सीचम मैदानावर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७.३ षटकांत सर्व गडी गमावून २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा डाव ४६.२ षटकांत २२६ धावांवर आटोपला. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेचा शेवट विजयाने करता आला.

australia
भारतीय डावाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम पाया मिळवून दिला. प्रियांशने ४९ धावांचे योगदान दिले, तर प्रभसिमरनने ३९ धावा केल्या. मात्र, त्यानंतर भारतीय फलंदाजीचा वेग मंदावला. देवदत्त पडिक्कल अवघ्या दोन धावा करून बाद झाला, तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ३३ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही. अशा परिस्थितीत सूर्यांश शेडगेने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरण्याची जबाबदारी पार पाडली. त्याने अवघ्या ६० चेंडूंत ६६ धावा फटकावत भारतीय धावसंख्येला गती दिली. विप्राज निगमनेही ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांच्या योगदानामुळे भारताला २७५ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शियस आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेत भारतीय फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला.
२७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने सुरुवातीला प्रतिकार केला. जोश फिलिपने ५६ धावा करत डावातील सर्वोत्तम खेळी केली. नॅथन मॅकस्वीनीने ३९, लॅकलॅन शॉने ३१, तर निखिल चौधरीने २९ धावा केल्या. या फलंदाजांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; मात्र नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्याने ऑस्ट्रेलियाला लक्ष्य गाठता आले नाही. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. यश ठाकूर आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. विप्राज निगम आणि अनुकूल रॉय यांनीही प्रत्येकी एक विकेट मिळवत विजयात योगदान दिले. या विजयामुळे भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या दोन पराभवांनंतर अखेर यश मिळाले. सूर्यांश शेडगेच्या अर्धशतकाने आणि गोलंदाजांच्या एकत्रित कामगिरीने भारताला शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दिला. तरीही मालिका २-१ अशी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने जिंकली.