मालेगाव,
soybean harvest मालेगाव तालुक्यातील मेडशी मंडळात सोयाबीन काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, यंदा प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. एकेकाळी सोयाबीनच्या भरघोस उत्पादनातून आर्थिक सुबत्ता अनुभवणार्या शेतकर्यांवर आता लागवडीचा खर्चही भरून निघत नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. एकरी सरासरी अवघे एक ते दोन क्विंटल उत्पादन मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वाशीम जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी उडीद, मूग, ज्वारी आणि कपाशीसारखी विविध पिके घेत असत. त्यानंतर सोयाबीन पिकाकडे शेतकर्यांचा कल वाढला. सुरुवातीच्या काळात कमी देखभाल खर्च, मर्यादित कीटकनाशकांचा वापर आणि तुलनेने चांगले बाजारभाव त्यामुळे सोयाबीनचे पीक शेतकर्यांसाठी आर्थिक आधार ठरले. कमी खर्चात भरघोस उत्पादन आणि चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली होती.
मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि काढणीच्या खर्चात वाढ झाली असताना सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. त्यात उत्पादनातही सातत्याने घट होत असल्याने शेतकर्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. यंदाही पावसाने शेतकर्यांची निराशा केली. सोयाबीन पीक फुलोर्यात असताना पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने दाणे भरण्यावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, यंदा एकरी केवळ एक ते दोन क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीसाठी झालेल्या मजुरीचा आणि यंत्राद्वारे काढणीचा खर्चही उत्पादनातून पूर्णपणे निघत नसल्याची परिस्थिती आहे.
रब्बी हंगामाचीही चिंता
अपुरा पाऊस आणि परिसरातील जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी असल्याने रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. विहिरी आणि इतर जलस्रोतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने गहू, हरभरा यांसारखी पिके घेण्याबाबत शेतकरी साशंक आहेत. खरीप हंगामातील नुकसान आणि रब्बी हंगामातील अनिश्चितता यामुळे वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोर उभा राहिला आहे.
पर्यायी पीक शोधावे लागेल
यंदा सोयाबीन उत्पादनातून लागलेल्या खर्चाच्या निम्माही खर्च निघाला नाही. अशा परिस्थितीत सोयाबीनची लागवड करणे परवडेनासे झाले आहे. पुढील वर्षी सोयाबीनला पर्यायी पीक शोधावे लागेल, अशी व्यथा अजिंक्य मेडशीकर यांनी व्यक्त केली.एकेकाळी शेतकर्यांना आर्थिक स्थैर्य देणारे सोयाबीनचे पीक आता तोट्याचे ठरत असल्याने उत्पादन खर्च कमी करणे, योग्य बाजारभाव मिळवून देणे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पर्यायी पिकांना प्रोत्साहन देणे आवश्यक झाले आहे. अन्यथा, शेतकर्यांचे आर्थिक संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.