गोंदियाच्या बोदलकसा जलाशयाच्या पाळीला 'भगदाड'!

- धानपिकावर संकट पाण्याचा विसर्ग सुरू : परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
गोंदिया,
gondias bodalkasa reservoir तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयाच्या पाळीला अंशतः भगदाड पडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरून शेकडो एकरांतील धानपिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे, प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
 
 
धानपिकाच्या नुकसानीची भीती...
 
 
बोदलकसा जलाशयाची क्षमता ०.५५ टीएमसी असून धरण छोटा आहे. त्यामुळे मोठ्या धोक्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाळीला पडलेले भगदाड वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जलाशयातील पाण्याच्या विसर्गामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यातच, तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
धानपिकाच्या नुकसानीची भीती...
सध्या धानपिकाचा हंगाम सुरू असताना जलाशयाच्या पाळीला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास शेतांमध्ये पाणी शिरून उभ्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या उपाययोजनांकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सदर धरण नहराच्या समोरूनच फुटला असल्याने पाण्याच्या विसर्ग हा नहारातूनच होत आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही परिस्थिती सामान्य आहे. प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असून खबरदारीच्या अनुषंगाने एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या प्रत्येकी एक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सध्या स्थिती नियंत्रणात आहे.
- राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया