नागपूर,
dhapewada-handloom-textileनागपूर जिल्ह्यातील धापेवाडा-कळमेश्वर परिसरातील पारंपरिक हातमाग उद्योगाला आधुनिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि हातमाग उद्योगाचा शुभारंभ शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
धापेवाडा परिसराला पारंपरिक विणकामाची समृद्ध परंपरा लाभली असून, स्थानिक विणकरांच्या कौशल्याला आधुनिक डिझाईन, ब्रँडिंग आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. उद्घाटन सोहळ्यात मुंबईतील मॉडेल्स धापेवाडा टेक्सटाईलच्या साड्या परिधान करून फॅशन शो सादर करणार आहेत. कॅडीएन्स अकादमीचाही यात सहभाग असेल. पारंपरिक हातमागाच्या साड्यांचे सौंदर्य आणि गुणवत्ता आधुनिक फॅशनच्या माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. यासोबतच स्थानिक आणि विदर्भातील महिलांना हातमागाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हेही या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथेही हातमाग वस्त्रोद्योगाचा अभिनव प्रयोग सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, टाकाऊ कापडाला नवे मूल्य मिळवून देणे आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कौशल्य विकास, पारंपरिक विणकामाचे जतन आणि ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नवाढीवर या प्रकल्पात भर दिला जात आहे. धापेवाडा टेक्सटाईलच्या माध्यमातून विदर्भातील हातमाग उद्योगाला नवी ओळख मिळण्यासोबतच विणकरांच्या कष्टाला योग्य मूल्य आणि पुढील पिढीला रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या संदर्भातील पत्रकार परिषदेला कंपनीचे संचालक सुधीर दिवे, राजश्री बापट, दिलीप धोटे, किरण खडगी, दिलीप डाखोळे, प्रभू महाराज पराते, गोविंदराव झोडे, गंगाधरराव नागपुरे, मिलिंद वेळेकर, ज्योती मानकर, सोनाली अंबोलीकर, सीमा साबळे, रुचिता पराते, रुपेश कुमार आणि नितीन कुलकर्णी उपस्थित होते.