वर्धा
fodder-crisis अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील जलाशये पूर्ण क्षमतेने भरली नाही. खरिपातील पिकांसह जनावरांसाठी पाणी तसेच चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील चारा उत्पादनात ५० टक्क्यांची घट व्यक्त केली जात असल्याने एप्रिल महिन्यानंतर जिल्ह्यात जनावरांसाठीच्या चार्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला पशुपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील पशुपालकांना उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत गाय व म्हैस तसेच शेळी-मेंढी वर्गीय ४ लाख ६२ हजार ६९५ जनावरे आहेत. या जनावरांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक दिवशी १ हजार ६४५ मेट्रीक टन चाऱ्याची गरज पशुपालकांना लागते. वास्तविक अल्प पर्जन्यमान व पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात अनेक शेतकरी सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेतात. मळणीनंतर सोयाबीनचे कुटार जनावरांसाठी चारा म्हणून वापरजे जाते. मात्र, यंदाच्या खरीपात पिकांना पाऊस खंडाचा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात ५० टक्के म्हणजेच १ लाख २३ हजार २७३ मेट्रीक टन चार्याचे उत्पन्न होईल, असा अंदाज पशुसंवर्धन व कृषी विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. चारा उपलब्ध न राहिल्यास अनेक पशुपालक त्यांच्याकडील पशुधनाची विक्री करण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाला आगामी चारा संकटावर मात करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
एका मोठ्या जनावराला प्रत्येक दिवशी किमान ६ किलो चाऱ्याची गरज असते. तर लहान जनावराला ३ किलो आणि शेळी व मेंढीला किमान १ किलो चारा गरजेचा आहे. जिल्ह्यात उपलब्ध १.२३ लाख मेट्रीक टन चारा हा जिल्ह्यातील ४.६२ लाख पशुधनाला कसाबसा मार्च महिन्यापर्यंत पुरेल. नंतर जिल्ह्यात चारा टंचाईची मोठी समस्या तोंड काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.