नवी दिल्ली,
global-heat-sept2026जगाला असाधारण उष्णतेचा सामना करावा लागतो आहे आणि आता ही चिंता केवळ तापमानाचे विक्रम मोडण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. सप्टेंबर २०२६ हा आतापर्यंत नोंदवला गेलेला दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला आहे.
अधिक तीव्र होत चाललेल्या ‘एल निनो’मुळे पॅसिफिक महासागर सतत गरम होतो आहे आणि अंटार्क्टिक समुद्रावरील बर्फाचे प्रमाणही असामान्यपणे कमी होते आहे, यामुळे जगाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो आहे.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी ३१’ हवामान शिखर परिषदेसाठी देश तयारी करत असताना, या घडामोडी वाढत्या तापमानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे स्पष्टपणे निर्देश करत आहेत. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स’द्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ (सी३एस) च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमधील जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.६३ अंश सेल्सिअसने अधिक होते. ऑगस्टनंतर १.५ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडणारा हा २०२६ मधील सलग दुसरा महिना ठरला.
जागतिक स्तरावर ऑगस्ट हा महिना जुलै २०२३ च्या बरोबरीने आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला असून, यात तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा १.६५ अंश सेल्सिअसने अधिक होते. सप्टेंबर महिना हा 'कोपरनिकस'च्या नोंदींनुसार सर्वात उष्ण ठरलेल्या सप्टेंबर २०२३ च्या तुलनेत केवळ ०.११ अंश सेल्सिअसने कमी उष्ण होता. ध्रुवीय प्रदेशाबाहेरील महासागरांमधील समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सप्टेंबरमध्ये २१.०५ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे कोपर्निकसच्या नोंदीनुसार त्या महिन्यातील सर्वाधिक आहे.
मध्य उष्णकटिबंधीय पॅसिफिकमधील या सागरी क्षेत्राचा वापर शास्त्रज्ञ 'एल निनो'वर लक्ष ठेवण्यासाठी करतात, तिथे समुद्राच्या पृष्ठभागाचे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक तापमान २९.७० अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
‘एल निनो’ अधिक तीव्र होत असताना, मानवनिर्मित हवामान बदलामुळे तापमानवाढीत त्याची भर पडू शकते. अधिक चिंताजनक बाब म्हणजे, तापमान १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याचा कालावधी २०२७ पर्यंत कायम राहील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
पावसाची चौथी सर्वात कमी नोंद
भारतालाही अति उष्णता आणि पाण्याची उपलब्धता यांबाबतच्या चिंतांचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ चा नैऋत्य मान्सून सामान्यपेक्षा १२.६ टक्क्यांनी कमी पाऊस पडला. २००१ नंतरची ही हंगामी पावसाची चौथी सर्वात कमी नोंद ठरली आहे.