गोवा
goa airport स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन विमानाने प्रवास करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी गोवा इंटरनॅशनल विमानतळ, डाबोळीम येथे पकडले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रवाशांकडून तीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दोन सिमकार्ड आणि ब्लूटूथ ईअरपीस जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर कागदपत्रेही मिळाली. दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी सुमारे २.२५ वाजता एक प्रवासी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-1340 या विमानाने गोव्याहून दिल्लीला जाणार होता. विमानात चढण्यापूर्वीच्या सुरक्षा तपासणीदरम्यान त्याने आपली हँडबॅग एक्स-रे तपासणीसाठी ठेवली. त्यावेळी एक्स-रे मशीनमध्ये बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याचे CISFच्या स्क्रीनरच्या निदर्शनास आले. त्यामुळे बॅगची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी ती पुढे पाठवण्यात आली.
तपासणीदरम्यान बॅगेत तीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दोन सिमकार्ड आणि तीन ब्लूटूथ ईअरपीस आढळून आले. स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी अशा उपकरणांचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. CISF जवानांनी प्रवाशाची चौकशी केली असता त्याने ही उपकरणे परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी असल्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान या प्रवाशाने त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती प्रवास करत असल्याचे सांगितले. संबंधित साथीदार याच विमानात आधीच बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर एअरलाइन कर्मचाऱ्यांच्या मदतीने CISF जवानांनी त्यालाही विमानातून खाली उतरवले. त्याच्या हँडबॅगची तपासणी केली असता एक इलेक्ट्रॉनिक उपकरण, दोन ब्लूटूथ ईअरपीस आणि एक सिमकार्ड सापडले. त्याचबरोबर त्याच दिवशी झालेल्या IIT गोवा नॉन-टीचिंग स्टाफ भरती परीक्षेतील अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट पदाचे प्रवेशपत्रही आढळून आले. या उपकरणाचा वापर याच परीक्षेत करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्याने चौकशीदरम्यान मान्य केले.
यानंतर दोन्ही संशयितांची संबंधित गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे चौकशी करण्यात आली. त्यावेळी पहिल्या प्रवाशाने आणखी गंभीर माहिती दिली. आपण दुसऱ्या उमेदवाराच्या जागी संबंधित परीक्षा देण्यासाठी गेलो होतो, अशी कबुली त्याने दिल्याचे समोर आले. त्याच्याकडून आणखी दोन व्यक्तींची आधारकार्डेही जप्त करण्यात आली. ही कागदपत्रे त्याने विमानतळाच्या सिक्युरिटी होल्ड एरियात फेकून दिली होती.
कारवाईनंतर दोन्ही goa airport प्रवासी, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे डाबोळीम विमानतळ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, संबंधित परीक्षा केंद्र पोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी दोघांना नंतर पोंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
CISFकडून देशभरातील विमानतळांवर विमान वाहतूक सुरक्षेची जबाबदारी पार पाडली जाते. डाबोळीम विमानतळावर सुरक्षा तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे इलेक्ट्रॉनिक उपकरणे वेळीच हाती लागले. त्यामुळे परीक्षेतील कथित गैरप्रकाराशी संबंधित साहित्य घेऊन दोन्ही संशयितांना गोव्याबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले.