अनिल कांबळे
नागपूर
clean water शहरातील पाणीपुरवठ्याबाबत पाहणी करण्यासाठी मुंंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पाच सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये आयआयटी मद्रास येथील प्रो. सायंटिस्ट डॉ. पवन लाभशेटवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माजी सहाय्यक इंजिनियर डॉ. कल्पना शेखर भोले, तसेच डॉ. कार्तिक बालसुंदरम, डॉ. अविनाश वासुदेव आणि अॅड. रवी सन्याल यांचा समावेश आहे. शहरातील पाणी पुरवठा , नळ जोडणी व इतर आवश्यक बाबींची पाहणी समिती करणार आहे.
समितीला हायकोर्टाने दोन आठवड्यात पाहणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचिकेवर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरात संपूर्णपणे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा दावा 'ऑरेंज सिटी वॉटर' (ओसीडब्ल्यू) कंपनीने मागील सुनावणीत प्रतिज्ञापत्राव्दारे केला होता.
शहरातील ९ झोनमध्ये दूषित पाणी पुरवले जात असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर हायकोर्टाने याची दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ओसीडब्ल्यू कंपनीला नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ओसीडब्ल्यूने आपली बाजू मांडताना फेब्रुवारी २०२६ मधील काही स्थानिक आणि विशिष्ट घटनांच्या आधारे संपूर्ण शहरात दूषित पाणी पुरवले जात असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. याचिकेत नमूद आकडेवारीत तफावत असून प्रयोगशाळेतील नमुने, दुरुस्तीच्या जागा आणि कॉल सेंटरवरील तक्रारी हे तीन वेगवेगळे घटक आहेत. एकाच समस्येसाठी अनेक नागरिक फोन करत असल्याने तक्रारींचा आकडा प्रत्यक्ष घटनेपेक्षा जास्त दिसू शकतो असे ओसीडब्ल्यूचे म्हणणे होते. कोर्ट मित्र अॅड. इशा महादुले, ओसीडब्ल्यूतर्फे अॅड. सुनील मनोहर, मनपातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
रोज १०० ठिकाणी क्लोरीनची तपासणी
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (सीपीएचईईओ) नियमांनुसार ३० लाख लोकसंख्येसाठी दरमहा ३०० नमुने तपासणे बंधनकारक असते; मात्र कंपनी दरमहा १,५०० ते १,७०० नमुन्यांची चाचणी करते. तसेच पेंच १, २, ३, ४ आणि कन्हान प्रकल्पांमध्ये डिस्इन्फेक्शन, सेडिमेंटेशन आणि फिल्टरेशन अशा तीन टप्प्यांत पाणी शुद्ध केले जाते. दररोज ९० नमुने गोळा करून ७० नमुने प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत (आरपीएचएल) आणि २० नमुने 'एनएबीएल' मान्यताप्राप्त मध्यवर्ती प्रयोगशाळेत तपासले जातात. तसेच दररोज १०० ठिकाणी पाण्यातील थेट क्लोरीनचे प्रमाण तपासले जाते असे ओसीडब्ल्यूने सांगितले.
कामात अडथळे कायम
शहरातील बेकायदेशीर जोडण्यांमुळे ड्रेनेजचे पाणी पाइपलाइनमध्ये शिरत असून, मे २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान शहरातील ७,३१० अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच रस्ते, मेट्रो, केबल आणि गडरच्या खोदकामामुळे २०२५ मध्ये १४७ वेळा तर २०२६ मध्ये (आॅगस्टपर्यंत) १०९ वेळा पाइपलाइनचे नुकसान झाले.