अनिल कांबळे
नागपूर
illicit affair परीसरात राहणाऱ्या महिलेशी अनैतिक संबंधांवरून सुरू असलेल्या वादातून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. पत्नीला वाचविण्यासाठी धावलेल्या मेहुण्यालाही आरोपीने मारहाण केल्याची घटना प्रतापनगर परिसरात घडली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी ४६ वर्षीय योगेश ज्ञानेश्वर नागपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी योगेश नागपुरे हा मॉडर्न हाउसिंग सोसायटी, प्रतापनगर येथील रहिवासी आहे. त्याची ४१ वर्षीय पत्नी नम्रता नागपुरे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, योगेशला दारू पिण्याचे व्यसन असून दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याच्या कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. या त्रासाला कंटाळून नम्रता यांनी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर त्या घरी परतल्या असता, संतप्त योगेशने त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि लाकडी दांडक्याने पाठीवर प्रहार केला.
या मारहाणीत नम्रता जखमी झाल्या. दरम्यान, बहिणीला मारहाण होत असल्याचे पाहून तिचा भाऊ संकेत याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगेशने त्यालाही मारल्याचा आरोप आहे. जखमी नम्रता यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नम्रता यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११८(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.