रणजी ट्रॉफीत जडेजाची शतकी खेळी!

सौराष्ट्रची ३९२ धावांची मजल

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Jadeja's century in the Ranji Trophy रणजी ट्रॉफीच्या एलिट गट ‘ब’ मध्ये सौराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आपल्या फलंदाजीचा दम दाखवला. जडेजाच्या शतकामुळे सौराष्ट्रला पहिल्या डावात ३९२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याने २०९ चेंडूंचा सामना करत १०२ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार लगावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जडेजाचे हे १६ वे शतक ठरले. विशेष म्हणजे, शतक पूर्ण केल्यानंतर धर्मेंद्रसिंह जडेजाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला आणि त्यासोबतच सौराष्ट्रचा पहिला डाव संपुष्टात आला.
 
 

jadeja 
 
सौराष्ट्रकडून प्रेरक मांकडनेही दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने १५० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२९ धावा केल्या. याशिवाय चिराग जानीने १४८ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि तीन षटकारांसह ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या तिघांच्या योगदानामुळे सौराष्ट्रला प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही.
 
 
छत्तीसगडकडून देव आदित्य सिंगने प्रभावी गोलंदाजी करत २४ षटकांत ६७ धावा देऊन पाच फलंदाजांना माघारी धाडले. रुद्र प्रताप आणि धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर संदीप वॉरियरने एक बळी मिळवला. आता सौराष्ट्रच्या ३९२ धावांना प्रत्युत्तर देताना छत्तीसगडचा संघ पहिल्या डावात किती धावा करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.