मुंबई
madhuri dixit बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही आपल्या अभिनयासोबतच दिलखुलास स्वभावामुळे चाहत्यांच्या चर्चेत असते. कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिने विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि १९९९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. माधुरीच्या या निर्णयाने त्यावेळी अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तिच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यांची मने तुटल्याची चर्चा आजही रंगते. नुकतेच ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या सेटवरही तिच्या लग्नाचा विषय निघाला आणि माधुरीने आपल्या खास विनोदी शैलीत दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने माधुरीला तिच्या लग्नाबद्दल एक रंजक प्रश्न विचारला. ‘तुमचं लग्न झालं, तेव्हा अनेकांचे हार्टब्रेक झाले होते का?’ असा प्रश्न सोनालीने केला. यावर माधुरीनेही हजरजबाबीपणा दाखवत मजेशीर उत्तर दिले. “म्हणूनच मी अशा माणसाशी लग्न केलं, जो हार्टमेड करतो,” असे ती म्हणाली. पती डॉ. श्रीराम नेने हे हृदयशल्यविशारद असल्याचा संदर्भ देत तिने हा विनोद केला. हृदय तुटलेल्या लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरशीच आपण लग्न केल्याचे तिच्या उत्तरातून सूचित झाले. माधुरीच्या या कोटीवर कार्यक्रमाच्या सेटवर एकच हशा पिकला.
‘कोण होणार करोडपती’मधील या संवादाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. माधुरीच्या विनोदी उत्तराची चर्चा होत असून, अनेक जण या व्हिडीओला पसंती देत आहेत.माधुरी दीक्षितने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिच्या अभिनयामुळे आणि नृत्यकौशल्यामुळे तिला हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळाले. तिच्या लोकप्रियतेमुळे ती अनेक चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली होती. अशा परिस्थितीत तिने विवाह केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
सध्या माधुरी आपल्या madhuri dixit कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. मोठ्या पडद्यावर तिचे दर्शन तुलनेने कमी होत असले, तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे चित्रपटांपासून काहीशी दूर असतानाही माधुरीची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येते.