मुंबई,
Malad Garba Festival in controversy मुंबईतील मालाड पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेला गरबा महोत्सव प्रवेशाच्या अटींमुळे चर्चेत आला आहे. मुंबई भाजपचे महासचिव विनोद शेलार यांच्या माध्यमातून या भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी सनातनी धर्म मान्य करणे आवश्यक असल्याचे विनोद शेलार यांनी म्हटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गरबा मैदानात प्रवेश करताना कपाळावर गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अटी मान्य नसणाऱ्या आणि टिळा लावण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींना महोत्सवात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गरबा महोत्सवाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवानंतर आता मुंबईसह देशभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घटस्थापनेनंतर गरबा, रास आणि दांडिया कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मालाडमध्येही पहिल्याच दिवशी गरबा खेळण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली. मुंबई आणि ठाणे परिसरात सार्वजनिक मंडळांसह राजकीय नेत्यांकडूनही गरबा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आणि दांडियाची रंगत कायम राहणार आहे. मात्र, मालाडमधील महोत्सवात प्रवेशासाठी घालण्यात आलेल्या धार्मिक अटींमुळे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.
दरम्यान, ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालाडमधील गरबा महोत्सवाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आली. मुंबई भाजपचे महासचिव विनोद शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात सुरू झालेल्या या महोत्सवाची चर्चा आता केवळ गरबा आणि दांडियापुरती मर्यादित न राहता प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटींमुळेही होत आहे.