ज्येष्ठ अभिनेत्री, लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन

वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
मुंबई
marathi actress madhu kambikar मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरवणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लावणी क्षेत्रातील एक महत्त्वाचे पर्व संपले आहे.
 

marathi actress madhu kambikar death at 73 | lavani artist passes away after illness 
२८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि तमाशाच्या माध्यमातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केल्यानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. चित्रपटांसोबतच लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
 
 
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधु कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. त्यानंतर ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. आई आणि सासूच्या व्यक्तिरेखांसह अनेक भूमिका त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रभावी केल्या. लावणीतील त्यांची खास शैली आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.
 
 
मधु कांबीकर यांच्या आयुष्यात २७ नोव्हेंबर २०१६ हा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा नृत्य सादर करणार होत्या. कार्यक्रम सुरू असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडत असतानाही त्यांनी सादरीकरण थांबवले नाही आणि जिद्दीने आपला कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यावर त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि उजवा हात बधीर झाल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
पक्षाघाताच्या याmarathi actress madhu kambikar  धक्क्यानंतर त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. आजारपणामुळे त्यांना अभिनय आणि आपल्या कलेपासून दूर राहावे लागले. पुढील काळात त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. रंगमंचापासून दूर जाण्याची वेळ आल्याने त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
 
 
मधु कांबीकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत २०१८ मध्ये त्यांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने त्यांची सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
लावणी, तमाशा, रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवणाऱ्या मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाने एक अनुभवी आणि प्रतिभावान कलावंत गमावला आहे. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासातील भूमिका आणि लावणीतील योगदान रसिकांच्या स्मरणात कायम राहणार आहे.