स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय..

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
पुणे
mpsc protest success एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांनुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सचिवपदी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मंत्री शिवेंद्रसिंह राजे रात्री उशिरा आंदोलनस्थळी पोहोचले. त्यानंतर एमपीएससीचे विद्यार्थी आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
 

mpsc protest success 
एमपीएससीच्या अध्यक्षपदावर असलेले विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा यापूर्वी सुरू झाली होती. मात्र, भीमनवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता आपण स्वतःहून रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भीमनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केल्याचे नमूद केले. आपल्या संपूर्ण सेवाकाळात नैतिकतेला प्राधान्य दिले असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर न राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांचे हित यांना कायमच प्राधान्य दिले असून, पुढेही तेच प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर पेपरफुटी प्रकरणात त्यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित झाले आणि विद्यार्थ्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार हे एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना रोहित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर दबाव वाढवला.
दरम्यान, एमपीएससीmpsc protest success  पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या चौकशी समितीत तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीच्या सचिवपदी त्यांची निवड झाल्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे पुण्यातील आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
रात्री उशिरा मंत्री शिवेंद्रसिंह राजे आणि आमदार रोहित पवार यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर सरकारकडून या निर्णयांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.