जेएनयू प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-bjp-jnu-protestदिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणासंदर्भातील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. वर्धमान चौक परिसरातील निमंत्रण हॉलजवळ हे आंदोलन पार पडले.
 

untitled
 
भाजपा महिला मोर्चाच्या नागपूर महानगर अध्यक्षा दिव्या धुरडे आणि पालक प्रगती पाटील, सभापती मनीषा अतकरे यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनातून संबंधित प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
 
शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून, महिलांच्या सन्मानाशी संबंधित प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही आंदोलनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली.
 
डिप्टी सिग्नल रोडवरील वर्धमान चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जेएनयूतील प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधित आरोपांबाबत सत्य समोर आणावे आणि विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.