भारतात हल्ल्याचा जमातचा कट उधळला

एनआयएची कारवाई; दहशतवादी जेएमबीच्या १३ सदस्यांना अटक

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
nia-jmb-terror-raidराष्ट्रीय तपास संस्थेने बंदी घातलेली दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) च्या एका शाखेने रचलेल्या कटाचा भंडाफोड करत दहशतवादी महमुदार कफाल याच्यासह संघटनेसाठी काम करणाऱ्या १३ आरोपींना अटक केली. आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमधील १६ ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

india
 
 
जमातचा दहशतवादी कफाल पश्चिम बंगालमध्ये लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २४ परगना जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मोबाईल आणि मेमरी कार्डसह अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने जारी केलेल्या निवेदनातून दिली. चौकशीत जेएमबीने पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यात दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती आरोपीच्या चौकशीतून समोर आली आहे.
 
 
गेल्या आठवड्यात आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळमधील १६ ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून कफाल याची माहिती मिळाली होती. पश्चिम बंगाल आणि भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये बंदी घातलेल्या संघटनेच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रसार करणे आणि दहशतवादी जाळे विस्तारण्याचा डाव दहशतवादी संघटनेने आखला आहे. तरुणांना कट्टरवादी बनवणे, अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करणे आणि संघटनेत लोकांची भरती करण्याची जबाबदारी आरोपींना देण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
 
भारतविरोधी प्रचारासाठी घेतल्या गुप्त बैठका
जेएमबीचा ज्येष्ठ सदस्य इमाम महमूद हबीबुल्ला याने संघटनेचा अजेंडा पुढे नेण्यासाठी आयएमके संस्थेची स्थापना केली होती. जेएमबीच्या कारवायांचा विस्तार करण्यासाठी आणि लोकांना कट्टरपंथी बनवण्याकरिता तसेच, भारतविरोधी प्रचार करण्याकरिता त्याने संस्थेच्या माध्यमातूनपश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यात गुप्त बैठका घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने अतिरेकी साहित्याचा प्रसार करून टेलिग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला. याशिवाय आयएमके-जेएमबी नेतृत्वाप्रती निष्ठा वाढवण्याचा आणि भारतात संघटनेचे जाळे मजबूत करण्याचाही त्याने प्रयत्न केला.