नवी दिल्ली,
Sai Sudharsan injured again रणजी ट्रॉफी २०२६-२७ च्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या दिवशी, सोमवारी (१२ ऑक्टोबर) जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थानविरुद्ध खेळताना भारतीय फलंदाज साई सुदर्शनला दुखापत झाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना तो अचानक मैदानावर पडला. त्याला त्रास होत असल्याचे दिसताच संघाचा फिजिओ तातडीने मैदानात दाखल झाला. मात्र, सुदर्शनला व्यवस्थित चालताही येत नसल्याने सपोर्ट स्टाफमधील सदस्याच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंडू गुडघ्याला लागल्यामुळे त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले असून, सध्या तो डगआऊटमध्ये गुडघ्यावर बर्फाची पिशवी ठेवून उपचार घेत आहे. वेदना वाढल्या नाहीत, तर तो पुन्हा मैदानात परतण्याची शक्यता आहे.
सुदर्शन पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतो का आणि राजस्थानचा डाव संपल्यानंतर तामिळनाडूकडून फलंदाजीसाठी उपलब्ध असतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, रविवारी तामिळनाडूच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा ऐनवेळी समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध इंडिया अ संघाकडून खेळण्यासाठी तो पुदुचेरी येथे होता. तेथून शनिवारी रात्री सुमारे १० वाजता तो तामिळनाडूच्या संघात दाखल झाला. तामिळनाडू संघ व्यवस्थापनातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शनचा संघातील समावेश अनपेक्षित होता. निवड समितीलाही याबाबत कल्पना नव्हती, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेबाबत आणि पुढील सामन्यांतील सहभागाबाबत उत्सुकता वाढली आहे.
२४ वर्षीय साई सुदर्शन नुकताच पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरला होता. अ संघाच्या दौऱ्यापूर्वी त्याला ही दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या चार रेड-बॉल डावांमध्ये त्याला केवळ एकदाच ५० धावांचा टप्पा ओलांडता आला. तसेच, पुदुचेरी येथे इंडिया अ संघाकडून खेळलेल्या दोन अनधिकृत एकदिवसीय सामन्यांत त्याने अनुक्रमे १ आणि १३ धावा केल्या होत्या. आता २६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडमधील लिंकन येथे सुरू होणाऱ्या तीन रेड-बॉल सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची इंडिया अ संघात निवड झाली आहे. त्यामुळे गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून तो या दौऱ्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होतो का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.