समृद्धी महामार्गावर ट्रकला आग; चालकासह दोघांचा मृत्यू

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे,
samruddhi expresswayनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी १२ ऑक्टोबरला पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रकचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक क्रॉस बॅरियरला धडकून काही अंतर घासत गेल्याने डिझेल टँक फुटला आणि वाहनाने पेट घेतला. या आगीत ट्रकचालकाचा होरपळून मृत्यू झाला, तर ट्रकमधून बाहेर पडताना पुलाखाली कोसळल्याने अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 

samruddhi expressway truck catches fire, two killed in fatal accident 
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान पासिंग असलेला (आरजे ११ जीसी ७३८३) हा ट्रक नाशिकहून पत्ता गोबी घेऊन पटनाकडे जात होता. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १२७+३०० येथे ट्रकच्या चालकाच्या बाजूचा पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक क्रॉस बॅरियरला धडकला. घर्षणामुळे डिझेल टँक फुटून ट्रकला आग लागली.
या अपघातात ट्रकचालक इखलास खान शहाबुद्दीन खान (वय २२, रा. राणीआला खुर्द, पलवल, हरियाणा) याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर जाहुल खान अली खान (वय २५, रा. राणीआला खुर्द, पलवल, हरियाणा) हा ट्रकमधून बाहेर पडताना पुलाखाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ट्रकमधील क्लिनर साहिब सईद खान (वय १८, रा. राणीआला खुर्द, पलवल, हरियाणा) याने बाहेर उडी घेतली. त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. समृद्धी महामार्गावरील पोलीस उपनिरीक्षक सुधीर गावंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गहरवाल आणि पोलीस कॉन्स्टेबल वाजिद शेख यांनी या घटनेची माहिती तळेगाव दशासर पोलिसांना दिली. ठाणेदार आवटे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
धामणगाव रेल्वे तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ऑक्टोबर महिन्यात अपघातांच्या घटनांची मालिका सुरूच आहे. २ ऑक्टोबर रोजी देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वर्धा येथील वाहनाला झालेल्या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी पिकअप व्हॅन उलटून नऊ मजूर गंभीर जखमी झाले होते. आता १२ ऑक्टोबर रोजी ट्रकला आग लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
 
 
अवघ्या अकरा दिवसांत samruddhi expressway घडलेल्या या तीन घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था, देखरेख आणि अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. महामार्गावरील वाहनांची सुरक्षितता, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजनांचा आढावा घेण्याची मागणी या घटनांच्या पार्श्वभूमीवर होत आहे.