चंद्रपूर
mahakali-temple chandrapur दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली माता अश्विन नवरात्रोत्सवाला उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला असून, संपूर्ण चंद्रपूर नगरीला यात्रेचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे, यंदा माता महाकाली मंदिर हे विद्युत रोषणाईव्दारा विविध नऊ रंगांनी झगमगणार आहे. दररोज एक विशेष रंग असे नऊ दिवसांच्या नऊ रंगांनी मंदिर नटलेले दिसेल.
रविवार, 11 ऑक्टोबर रोजी परंपरेनुसार पहाटे 4 वाजता देवस्थानचे पुरोहित प्रतिक महाराज देहणकर, अशोक पांडे यांच्या मंत्रोच्चारात मंदिर व्यवस्थापक सुनील महाकाले व क्षमा महाकाले यांच्या हस्ते धार्मिक विधींनी नऊरात्रीची सुरूवात झाली. घटस्थापनेनंतर परंपरेनुसार महाकाली मंदिर परिसरात हळद उधळण करत, डफ वाजवत भाविकांनी परिसर हळदीमय केला होता. तर, आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सप्तमीपासून मंदिराच्या गाभार्यात विविध फुलांची आरास करून मंदिर फुलांनी सजवण्यात येणार आहे. तसेच, यंदा नवमी व दशमी तिथी एकाच दिवशी आल्याने 20 ऑक्टोबर रोजी महापूजा होणार आहे. अष्टमीला चंडी यज्ञ असल्यामुळे मराठवाडा भागातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात मातेच्या दर्शनासाठी येतात.
भाविकांसाठी देवस्थानतर्फे विविध सोयीसुविधा
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालाय, मंदिर परिसरात स्वच्छतागृहे, धर्मशाळा, पिण्याच्या पाणी, दर्शनासाठी मजबूत रेलिंगसह रांग व्यवस्था, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये व वातावरण थंड राखण्यासाठी पंखे व कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी स्वच्छता दूत, रांग व पाणी व्यवस्थापनासाठी रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 100 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. फायर ऑडिट करण्यात आले असून अनुचित घटना घडू नये म्हणून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.हरविलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियंत्रणासाठी पोलिस विभागास विशेष विनंती करण्यात आली आहे.