बारामती
someshwar sugar factory election राज्याचे लक्ष लागलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली असून, पहिल्याच निकालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला आहे. ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि कारखान्याचे माजी संचालक संग्राम सोरटे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय नोंदवला.
‘ब’ वर्ग गटात संग्राम सोरटे यांना १३१ पैकी ९३ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकनेते पॅनेलचे महेश राणे यांना ३६, तर अपक्ष उमेदवार प्रकाश जगताप यांना एक मत मिळाले. पहिल्याच निकालात विजय मिळाल्याने सुनेत्रा पवार यांच्या गोटात तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारखान्याच्या २१ जागांसाठी रविवारी सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता ९३ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी चुरशीचे वातावरण असून, पहिला निकाल ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी गटाचा जाहीर झाला. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी स्वतः याच गटातून मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे या गटातील संग्राम सोरटे यांच्या विजयाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री someshwar sugar factory election अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिली मोठी निवडणूक असल्याने सोमेश्वर कारखान्याची निवडणूक सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. निवडणुकीचा थेट अनुभव नसतानाही त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून सोमेश्वर कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात तळ ठोकून प्रचाराची धुरा सांभाळली. युवा नेते जय पवार यांनी केलेले दौरे आणि खासदार पार्थ पवार यांनी पडद्यामागून केलेले सूक्ष्म नियोजन यामुळे पॅनेलला संघटनात्मक बळ मिळाले. माजी मंत्री तथा आमदार विजय शिवतारे, मंत्री मकरंद पाटील आणि सचिन कांबळे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलला भक्कम साथ दिली.कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या ‘लोकनेते अजितदादा पवार पॅनेल’विरोधात राजेंद्र जगताप यांच्या ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’नेही मैदानात उतरत तिरंगी लढत निर्माण केली होती. या चुरशीच्या लढतीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने पहिल्याच निकालात आघाडी घेत विजयाचे खाते उघडले आहे.दरम्यान, कारखान्याच्या उर्वरित उत्पादक गटांतील मतमोजणी वेगाने सुरू असून, सायंकाळपर्यंत अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, सुरुवातीलाच मिळालेल्या या विजयामुळे सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने निवडणुकीची दिशा आपल्या बाजूने वळवल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.