विवाहित प्रियकरासाठी विद्यार्थिनीचा आईवडिलांसोबत राहण्यास नकार!

लग्नाच्या दबावामुळे घर सोडल्याचे मत ; प्रियकराच्या पत्नीचे न्यायालयात खेटे

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
student refuses बाराव्या वर्गात शिकणारी मुलगी दोन मुलांचा बाप असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली. आ‌ईवडिल दुसरीकडे लग्न करुन देतील म्हणून तिने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच प्रियकरासोबत पळ काढला. मुलीच्या आईवडिलांनी न्यायालयात प्रियकराविरुद्ध खटला भरला. मात्र, मुलीने आईवडिलांकडून धोका असल्याचे सांगून विवाहित प्रियकरासोबत राहण्यास पसंती दिली. तर पती परत घरी यावा यासाठी त्याची पत्नी न्यायालयाच्या माध्यमातून लढा देत आहे.
 

student refuses to live with parents, chooses married boyfriend with two children 
 
 
 
 
कुशल आणि अंजू (काल्पनिक नावे) हे दोघेही एकमेकांच्या नात्यात. कुशलने एका लग्नात अंजूला बघितले आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. त्यानंतर तो दुसऱ्या राज्यात शासकीय नोकरीवर लागला. त्याने अंजूच्या वडिलांना अंजूशी लग्न करण्याची मागणी घातली. मात्र, अंजूला पुढील शिक्षण घ्यायचे असल्यामुळे तिने लग्नास नकार दिला. कुशलला ती आवडत असल्यामुळे चार नातेवाईकांना गळ घालून अंजूशी लग्न लावून देण्याची गळ घातली. नातेवाईक असल्याने आईवडिलांनी अंजूची इच्छा नसतानाही लग्न लावून दिले. दुसरीकडे लग्नानंतर एका वर्षात त्याने नोकरी सोडून सुरक्षारक्षकांची एजन्सी टाकली. त्याला एक मुलगा व मुलगी झाली. त्यानंतर तो अंजूच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला रोज मारहाण करायला लागला. यादरम्यान, त्याची चुलत मामेबहीण निता (काल्पनिक नाव) त्याच्या घरी शिक्षण घेण्यासाठी आली. तिच्यावर कुशलची नजर पडली. अल्पवयीन असलेल्या निताला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन कुशलच्या प्रेमात वेडी झाली.
शिक्षण सोडून प्रियकरासोबत पलायन
 
कुशलले तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले. ती शिक्षण सोडून कुशलसोबत पळून गेली. मध्यप्रदेशातील एका शहरात दोघेही राहायला लागले. निताच्या आईवडिलांना हा प्रकार लक्षात आला. त्यांचा मुलीशी संपर्क होत नव्हता तर कुशलही याबाबत चकार शब्दही काढत नव्हता. त्यामुळे तिचे आईवडिल चिंतेत पडले.
 
 
पत्नीचे मुलांसह न्यायालयात खेटे
 
दुसरीकडे अंजू दोन्ही मुलांना घेऊन पती परत यावा म्हणून प्रयत्न करीत आहे. पतीचे घर बँकेने जप्त केल्यामुळे ती बेघर झाली आहे. तर कुशल हा पत्नीला सोडून दुसरीकडे राहत आहे. दोन्ही मुलांच्या पालनपोषणाचा खर्चही देण्यास तो तयार नसल्याने अंजून न्यायालयात खावटीचा दावा केला. तर मुले वडिलांच्या प्रेमासाठी मुकले आहेत.
 
 
मला पालकांसोबत राहायचे नाही
 
निताच्या पालकांनी मुलगी परत यावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. कुशलने निताला विश्वासात घेत न्यायालयात हजर केले. ‘मला पालकांसोबत राहायचे नाही. त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे’ असे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयानेही तिला स्वतंत्र राहण्यास परवानगी दिली. तिला इजा पोहचू नये म्हणून मध्यप्रदेशातील शहरातपर्यंत पोलिस संरक्षणात सोडून देण्याचे आदेश दिले.