अकोला जिल्ह्यात दोन ठिकाणी होणार थ्रोम्बोलिसिस सेंटर

हृदयविकाराच्या रुग्णांना दिलासा:१३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
अकोला
thrombolysis-centers रुग्णांना हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळावेत यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय, आणि उपजिल्हा रुग्णालय, मूर्तीजापूर येथे थ्रोम्बोलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार असून, या दोन्ही केंद्रांसाठी स्वतंत्र तीन खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.ही केंद्रे लवकरच नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित होणार असून उपसंचालक, आरोग्य सेवा तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
 

akola news
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत आणि गंभीर गुंतागुंत टाळता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. दोन्ही थ्रोम्बोलिसिस सेंटरसाठी एकूण १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.यामध्ये दोन फिजिशियन, चार वैद्यकीय अधिकारी आणि सात परिचारिकांचा समावेश आहे. प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यकतेनुसार तातडीचे उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी जागतिक थ्रोम्बोसिस दिन साजरा केला जातो.थ्रोम्बोसिसचा धोका कमी करण्यासाठी नियमित चालणे व व्यायाम करणे, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, धूम्रपान टाळणे आणि दीर्घकाळ एकाच जागी बसून न राहता अधूनमधून हालचाल करणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

थ्रोम्बोलिसिस म्हणजे काय?
रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेली गुठळी याला थ्रोम्बोलिसिस म्हणतात.यासाठी विशिष्ट औषधांचा वापर केला जातो.या उपचार पद्धतीला थ्रोम्बोलिसिस म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे उद्भवलेल्या विशिष्ट प्रकारच्या स्ट्रोकमध्ये योग्य रुग्णाची निवड करून हे उपचार केले जाऊ शकतात.
जिल्हा स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय, मूर्तीजापूर येथे सुरू होणारी थ्रोम्बोलिसिस केंद्र जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत. वेळेत निदान, प्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि योग्य उपचार यांच्या समन्वयातून नागरिकांना अधिक परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

-डॉ.बापूराव पवार वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला