‘तुमचं नाव तुकाराम, मग असं काम का करता?

तुकाराम मुंढेंना नागरिकाचे शिव्यांनी भरलेलं पत्र

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
मुंबई
tukaram mundhe मुंबई प्रशासकीय सेवेत आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. खाद्यपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकाने, स्टॉल्स आणि हातगाड्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तपासणीनंतर दोषी आढळणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याबरोबरच काहींचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, मुंढे यांच्या कठोर कारवाईची चर्चा आजची नाही. यापूर्वीही विविध पदांवर काम करताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. अशाच एका कारवाईनंतर त्यांना थेट शिव्यांनी भरलेले पत्र मिळाले होते. या पत्रामागील कारण ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
 

tukaram mundhe 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील हा जुना प्रसंग सांगितला. आपल्याला मिळालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी तक्रार कोणती, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी २००७ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडलेल्या घटनेची आठवण सांगितली.
त्या वेळी मुंढे यांचे बार्शी येथे प्रशिक्षण सुरू होते आणि त्यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या काळात शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी मोठी मोहीम राबवली. अवघ्या दोन ते तीन दिवसांत सुमारे १,५०० बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे मुख्याधिकारीपदाचा कार्यभार केवळ चार आठवड्यांसाठी होता. या काळात त्यांना नागरिकांकडून अनेक पत्रे आली. त्यातील काही पत्रांमधून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले, तर काहींमधून टीका करण्यात आली. मात्र, एका पत्राने त्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
 
 
‘तुमचं नाव तुकाराम, मग असं काम का करता?’
मुंढे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्राची सुरुवात त्यांच्या नावाने करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण पत्रात शिवीगाळ करण्यात आली होती. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी अशा प्रकारे काम का करावे, असा संताप व्यक्त केला होता. पत्रातील भाषा अत्यंत आक्षेपार्ह असली, तरी ते लिहिण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी मुंढे यांनी संपूर्ण पत्र वाचून काढले.
पत्राच्या शेवटी लिहिलेल्या एका वाक्यामुळे या प्रकारामागील कारण स्पष्ट झाले. अनेक वर्षांनंतर संबंधित व्यक्ती बार्शी येथे परतली होती. मात्र, शहरातील अनधिकृत बांधकामे हटविल्यामुळे तिला स्वतःचे घर शोधताना मोठा त्रास झाला होता. परिसरातील रस्ते आणि घरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ओळखणे कठीण झाल्याने त्या व्यक्तीने आपला संताप पत्रातून व्यक्त केला होता.
आपल्या कारवाईमुळे tukaram mundhe संबंधित व्यक्तीला स्वतःचे घर शोधण्यासाठीही अडचणी आल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. मुंढे यांनी मुलाखतीत हा प्रसंग सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईमुळे एका नागरिकाने थेट शिव्यांनी भरलेले पत्र पाठवावे, हा प्रसंग त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील वेगळाच अनुभव ठरला.दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी सध्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातही आपल्या कार्यपद्धतीनुसार तपासणी आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपासून ते स्वयंपाकघरातील स्वच्छतेपर्यंत विविध बाबींची तपासणी केली जात आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते का, स्वच्छतेचे नियम पाळले जातात का आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न दिले जाते का, याची पडताळणी केली जात आहे.
रस्त्यावरील हातगाड्यांपासून ते प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सपर्यंत विविध आस्थापनांवर प्रशासनाचे लक्ष आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून, परवाने रद्द करण्यासारखी कठोर पावलेही उचलली जात आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या व्यवसायातील नियमपालन आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विविध विभागांमध्ये काम करताना कठोर निर्णयांसाठी ओळख निर्माण केलेल्या तुकाराम मुंढे यांच्या बार्शीतील जुन्या आठवणीमुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे.