किनारी सुरक्षेला नवी ताकद;‘मांग्रोल’ युद्धनौका ताफ्यात दाखल

    दिनांक :12-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Warship Mangrol inducted into Navy भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधण्यात आलेली तिसरी अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘मांग्रोल’ सोमवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे विशेष समारंभात या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्स्यायन यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील किनारी शहर आणि प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या मांग्रोलच्या नावावरून या युद्धनौकेला नाव देण्यात आले आहे. यापूर्वीच्या आयएनएस मांग्रोल (एम-८५) या युद्धनौकेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारीही नव्या युद्धनौकेकडे असेल.
 
 
 
naouka
 
किनारपट्टीजवळील उथळ पाण्यात मोठ्या युद्धनौकांना कामकाज करताना मर्यादा येतात. अशा परिस्थितीत ‘मांग्रोल’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बंदरे, हार्बर आणि किनारी सागरी मार्गांची सुरक्षा मजबूत करण्यासोबतच नौदलाच्या मोठ्या मोहिमांना मदत करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या युद्धनौकेच्या निर्मितीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे युद्धनौकेची रचना, बांधणी तसेच प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालींचे एकत्रीकरण करण्यातील भारताची क्षमता अधोरेखित झाली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांच्या दिशेनेही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 
‘मांग्रोल’मध्ये वॉटर जेट प्रोपल्शन प्रणालीसह तीन डिझेल इंजिन बसवण्यात आले आहेत. त्यामुळे उथळ पाण्यातही युद्धनौकेला प्रभावीपणे हालचाली करता येतात. पाण्याखालील धोक्यांचा शोध घेण्यासाठी यात अभय हल-माउंटेड सोनार, हलके टॉर्पेडो, स्वदेशी अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर आणि मारीच ॲडव्हान्स्ड टॉर्पेडो डिकॉय सिस्टीम यांसारखी उपकरणे आहेत. पाण्याखालील देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि माइन वॉरफेअरशी संबंधित कामे करण्याची क्षमताही या युद्धनौकेत आहे. बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीत संभाव्य पाण्याखालील धोक्यांचा सामना करण्यासाठी ‘मांग्रोल’ सागरी गस्त विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्या समन्वयाने काम करणार आहे.