‘तुम्हाला स्टेट बँकेत नोकरी हवी आहे का?’

चक्क आमदारालाच आला फोन, पोलिसांकडून तपास सुरू

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
नागपूर
cyber crime आजकाल फसवणूक करणारे भामटे हातातील फोनच्या मार्गे लोकांच्या जीवनात शिरकाव करतात आणि लाखो, करोडोंचा चुना लावून जातात. असे कितीतरी सर्वसामान्य लोक फसव्या भूलथापांना बळी पडून आपले पैसे गमावून बसतात. मात्र, बरेचदा हे भामटेही फसतात आणि आपण कुठल्या सर्वसामान्य व्यक्तीला नाही तर मोठ्या अधिकारी किंवा नेत्यालाच फोन लावतोय. पूर्व नागपूरचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविणारा फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खोपडे यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 

cyber
आमदार कृष्णा खोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख ‘सिंह’ अशी करून देत आपण एसबीआयचा मॅनेजर असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या तीन मुलांची नावे दिल्यास त्यांना बँकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. बँकेत तीन जागा रिक्त असल्याचा दावाही या व्यक्तीने केला.
मात्र, संबंधित फोन क्रमांकाबाबत संशय आल्याने आमदार खोपडे यांनी त्या क्रमांकाची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानंतर हा क्रमांक रोहित नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची गंभीर दखल घेत खोपडे यांनी पोलिसांना पत्र देऊन तक्रार नोंदवली.
नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने बेरोजगार आणि गरजू तरुणांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार खोपडे यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, लकडगंज पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून, फोन करणाèया व्यक्तीची ओळख आणि या प्रकारामागील नेमका उद्देश काय होता, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.