नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले
गोंदिया,
fda-raids-shalimar-hotel शहरातील कुडवा परिसरात असलेल्या शालीमार हॉटेलच्या मिठाई निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी अचानक धाड टाकली. या तपासणीत अस्वच्छ परिस्थितीत ठेवलेली मिठाई, उघड्यावर साठवलेली बुंदी आणि संशयास्पद कच्चा माल आढळून आला. पथकाने संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने घेतले असून, साठ्याबाबत पंचनामा करून पुढील तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी घोरपडे आणि अन्न सुरक्षा अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळच्या सुमारास पथकाने कारखान्यात प्रवेश करून मिठाई निर्मितीची प्रक्रिया, साठवणूक आणि स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले मिठाईचे तुकडे, उघड्यावर असलेली बुंदी तसेच अस्वच्छ गोण्यांमध्ये साठवलेला कच्चा माल आढळल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी खाद्यपदार्थांची तपासणी करून नमुने संकलित केले. तसेच आढळलेल्या वस्तूंची नोंद घेऊन पंचनामा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यावेळी पोलिस आणि महसूल विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही...
सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढत असताना खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे संबंधित विभागाकडून यावेळी स्प्ष्ट करण्यात आले आहे.