वाघाला जेरबंद केल्याचा वनविभागाचा दावा फोल?

बोडखा ग्रामस्थांना वाघाचे दर्शन

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
वरोडा
apturing-the-tiger वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवर समुद्रपूर वन विभागाने नुकतेच एका वाघाला जेरबंद केले. हा जेरबंद केलेला वाघ बोडखा येथील असल्याचा दावा वरोडा वनविभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला. मात्र, बोडखा शिवारात वाघ फिरत असल्याचा ग्रामस्थांनी दावा करीत वाघाचे पगमार्क असलेला व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकताच वनविभागाचा दावा फोल ठरल्याचे निदर्शनास आले. अखेर या परिसरात पिंजरे लावून प्रकरणाची सारवासारव करणे सुरु झाले.
 
tiger
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शेतशिवारात मागील एक महिन्यापासून वाघाने धुमाकूळ घालत एका इसमास जखमी केले व अनेक पाळीव प्राणी फस्त केले होते. तसेच समुद्रपूर सीमेलगत असलेल्या वरोडा तालुक्यातील बोडखा गावाच्या शिवारात वाघाने एका व्यक्तीला जखमी केले. तर दोन युवक वाघाच्या हल्ल्यात बचावले होते. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी पवनगाव व बोडखा ग्रामस्थांनी केली. नुकतेच समुद्रपूर वनविभागाने त्यांच्याच हद्दीत त्या वाघाला पिंजर्‍यात जेरबंद केले. पिंजर्‍यात वाघ जेरबंद झाल्याबरोबरच वरोडा वनविभागाने तालुक्यातील बोडखा परिसरातील वाघ जेरबंद झाला. आता तिथले जनजीवन सुरळीत चालू आहे आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडला, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तर बोडखा शिवारात शुक्रवारी वाघाचे पगमार्क आढळून आले. ग्रामस्थानी त्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर टाकताच वरोडा वनविभागाची भांबेरी उडाली. अखेर वरोडा वनविभागाने बोडखा शिवारात वाघाला जेरबंद करण्याकरिता कॅमेरे व पिंजरे लावले. या संदर्भात बोडखा येथील ग्रामस्थ गणेश चिडे म्हणाले की, बोडखा गावाच्या परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आले. त्यामुळे वाघ या परिसरात असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र, वनविभागाने केलेला दावा हा खोटा असल्याने येथे पिंजरे लावण्याचे काम सुरू आहे.
ग्रामस्थांनी भीती बाळगू नये : सुनील मडावी
समुद्रपूर व वरोडा तालुका एकमेकालगत आहे. वाघाला पकडण्यासाठी बोडखा व पवनगाव सीमेवर पिंजरे लावले होते. त्यामध्ये एक वाघ कैद झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी भीती बाळगू नये. मात्र, खबरदारी म्हणून बोडखा गावाच्या शिवारात पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी यांनी दिली.