राज्यात उन्हाचा ‘रुद्रावतार’

IMD चा उष्णतेबाबत इशारा

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
मुंबई,
IMD heat warning महाराष्ट्रात परतीच्या मान्सूननंतर उन्हाची तीव्रता वाढली असून, ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात तापमानवाढीबरोबरच दमट हवामानामुळे अस्वस्थता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकणातील काही भागांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर दिवसा उन्हाचा चटका अधिक जाणवत असून, समुद्रकिनारपट्टीवरील हवेत आर्द्रता जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवू शकतो.
 
 

राज्यात उन्हाचा ‘रुद्रावतार’ 
 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. रत्नागिरी येथे ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, अमरावती आणि अकोला येथेही तापमान ३८ अंशांच्या वर गेल्याची माहिती आहे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता असते; मात्र यंदा वाढते तापमान, दमट हवा आणि पावसाचा कमी झालेला प्रभाव यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवू शकतो.
 
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, पुरेसे पाणी प्यावे आणि हलके, सैल सुती कपडे परिधान करावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणि आर्द्रतेतील बदलांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.