देऊळगाव मही (प्रतिनिधी)
fencing तलवारबाजीसारख्या वेग, कौशल्य, एकाग्रता आणि धैर्याची कसोटी पाहणाऱ्या खेळात देऊळगाव मही येथील शिंगणे भावंडांनी उल्लेखनीय यश संपादन करत गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. वैष्णवी संतोष शिंगणे हिने शालेय तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर झेप घेतली असून, तिचा भाऊ वेद शिंगणे याने राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकत्याच परभणी येथे पार पडलेल्या ७ व्या चाइल्ड मिनी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत वेद शिंगणे याने अंडर-१२ सेबर (Saber) प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्रातून १६ वा क्रमांक मिळविला. या यशाच्या जोरावर त्याची ९४ वी मिनी चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा, जम्मू-काश्मीर येथे निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने प्रभावी खेळ करत भारतातून ४७ वा क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे त्याने आपल्या कॅम्ब्रिज शाळेसह देऊळगाव महीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले.
दुसरीकडे, सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथील विद्यार्थिनी वैष्णवी संतोष शिंगणे हिने १७ वर्षांखालील फॉइल (Foil) प्रकारात जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर अमरावती येथे झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवून शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दोन्ही भावंडांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, नियमित सराव, शिस्त, चिकाटी आणि जिद्द असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. तलवारबाजीसारख्या अत्यंत आव्हानात्मक खेळात त्यांनी मिळवलेले यश अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहकार संस्थेच्या वतीने दोन्ही खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
आपल्या यशाचे श्रेय दोन्ही खेळाडूंनी क्रीडा शिक्षक नितीन जेऊघाले सर, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव शेषनारायण लोढे सर, प्रशिक्षक आकाश बनसोडे सर, प्राचार्य जगताप सर, डांगे मॅडम, मुढे सर, हुड सर, तसेच शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि आपल्या आई-वडिलांना दिले.
शिंगणे भावंडांच्या या प्रेरणादायी यशामुळे देऊळगाव मही परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची प्रेरणा मिळत आहे.