कुडवा येथील दूध डेअरीत आढळले बुरशीयुक्त पदार्थ

जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई, हजारो किलो साठा नष्ट

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
गोंदिया
moldy dairy-products  जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाने १३ ऑक्टोबर रोजी शहराला लागून असलेल्या कुडवा येथील लोहिया पार्क परिसरातील शिफा दूध डेअरीवर तपासणी करून कारवाई केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणावर बुरशीयुक्त, दुर्गंधीयुक्त आणि मानवी सेवनासाठी अयोग्य असलेले दुग्धजन्य पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेले हजारो किलो पदार्थ शहराबाहेर खड्डा खोदून पुरून नष्ट करण्यात आले. याशिवाय, अप्रमाणित वजनकाटा आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या व्यावसायिक वापरासंदर्भातही कारवाई करण्यात आली.
 
dairy
जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांचा सहभाग होता. डेअरीची तपासणी केली असता पनीर, खवा, कुंदा, रसगुल्ले आणि पेढे यांसारखे दुग्धजन्य पदार्थ व मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळली. पदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या शीतगृहाच्या भिंतींवर काळी व हिरवी बुरशी साचलेली होती. परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण, जमिनीवर सांडलेले धान्य, उघड्यावर ठेवलेला कच्चा माल आणि अस्वच्छ भांडी आढळून आली. तसेच, रसगुल्ल्यांच्या एका डब्यात मृत कीटक, माश्या आढळल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. या परिस्थितीमुळे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले.
 
मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे हे पदार्थ जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. तपासणीदरम्यान डेअरीमध्ये दूध खरेदी किंवा विक्री केल्याच्या अधिकृत पावत्या, नोंदवही अथवा संबंधित अभिलेख आढळून आले नाहीत. त्यामुळे दूध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबाबत आवश्यक नोंदींच्या अभावाची बाब समोर आली. या प्रकरणात संबंधित विभागांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. वैधमापन शास्त्र विभागाने केलेल्या तपासणीत डेअरीमध्ये शासनमान्य प्रमाणपत्र नसलेला वजनकाटा वापरला जात असल्याचे आढळले. ग्राहकांना योग्य वजनात वस्तू मिळणे आवश्यक असताना नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित वजनकाटा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले हजारो किलो दुग्धजन्य पदार्थ शहराबाहेरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून हे पदार्थ पुरून नष्ट करण्यात आले.
 
सात घरगुती गॅस सिलिंडर जप्त
डेअरीमध्ये मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती वापराच्या लाल रंगाच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचे तपासणी पथकाला आढळले. त्यानंतर पुरवठा विभागामार्फत तातडीने कारवाई करून सात घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी डेअरी चालकाविरुद्ध पुरवठा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.