पत्नी माहेरी गेल्याचा राग बहिणीवर; चाकूने दोन्ही हातांवर वार!

मोबाईल फोडला, आईलाही जीवे मारण्याची धमकी

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
knife पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरून एका तरुणाने स्वतःच्या बहिणीवर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले. एवढेच नव्हे, तर तिचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि वाद सोडविण्यासाठी आलेल्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. उत्तम मेश्राम (२२, रा. गुलमोहर नगर) असे आरोपीचे नाव आहे.
 

nagpur crime: man stabs sister with knife over wife leaving for her parents 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमची बहीण गायत्री हिने प्रेमविवाह केला आहे. काही दिवसांपूर्वी ती भावाच्या घरी राहण्यासाठी आली होती. दरम्यान, उत्तमचे पत्नीशी भांडण झाले आणि ती माहेरी निघून गेली. बहिणीमुळेच पत्नी घर सोडून गेल्याचा समज झाल्याने उत्तम तिच्यावर संतापला होता.
 
 
याच रागातून रविवारी मध्यरात्री उत्तमने गायत्रीशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त उत्तमने गायत्रीला शिवीगाळ करीत चाकूने तिच्या दोन्ही हातांवर वार केले. या हल्ल्यात ती जखमी झाली. त्यानंतर त्याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तो फोडून टाकला. बहिण-भावातील वाद सुरू असताना त्यांची आई मध्यस्थी करण्यासाठी आली. मात्र, उत्तमने आईलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि वाद मिटविला. या घटनेनंतर गायत्रीने मध्यरात्री कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी उत्तम मेश्रामविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलिस करीत आहेत.