नागपूर
panyane-petla-vanva- play पाण्याचा एक घोटही माणसाच्या प्रतिष्ठेचा होता. तहान भागवण्यास पाणी घेण्याचा अधिकार नाकारला होता,अशा अमानवी सामाजिक वास्तवा विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक लढ्याची ज्वलंत कहाणी आता विदर्भाच्या रंगभूमीवर साकारणार आहे. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांत रसिकांची दाद मिळवणारे युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक १५ ऑक्टोबरपासून विदर्भातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
१५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर-२०२६ या कालावधीत विदर्भातील ११ शहरांत या नाटकाचे १२ प्रयोग आयोजित आहेत. स्वाभिमाना पेटलेल्या एका ऐतिहासिक संघर्षाची, मानवी प्रतिष्ठेची आणि समतेच्या विचारांची रंगमंचीय अभिव्यक्ती आहे. अन्यायाने गुदमरलेल्या समाजाच्या वेदना, हक्कांसाठी उभे राहण्याचे धैर्य आणि परिवर्तनासाठी पेटून उठलेल्या संघर्षाची ताकद या नाटकातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. काही प्रसंग डोळ्यांत अश्रू आणतील. काही अंतर्मनाला अस्वस्थ करतील. तर काही माणूस म्हणून आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतील.
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे झालेला चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरला. हा संघर्ष केवळ सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याच्या अधिकारापुरता मर्यादित नव्हता. तो माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा, सामाजिक विषमतेला आव्हान देण्याचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्रस्थापित करण्याचा लढा होता. पाण्याच्या एका घोटातून माणुसकीचा प्रश्न उभा करणाऱ्या या आंदोलनाने भारतीय समाजव्यवस्थेला मूलभूत प्रश्न विचारले. हा लढा संघर्ष व स्वाभिमानाचा होता! ठिणगी होती एका घोटाची. पण वणवा होता सामाजिक परिवर्तनाचा! याच ऐतिहासिक जाणिवेचा प्रत्यय ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकातून येतो.
आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या नाटकाचे लेखन आणि गीतरचना केली आहे. प्रशांत निगडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाचे नाट्यरूपांतर करताना त्या काळातील सामाजिक परिस्थिती, अन्यायाची तीव्रता, संघर्षामागील विचार आणि समतेच्या लढ्याची प्रेरणा प्रभावीपणे रंगमंचावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ इतिहासाची पुनरावृत्ती करत नाही, तर इतिहासाच्या आरशात वर्तमान समाजालाही पाहायला भाग पाडते. शंभर वर्षांपूर्वी समता, स्वाभिमान आणि मानवी प्रतिष्ठेसाठी उभा राहिलेला संघर्ष आजच्या पिढीला काय सांगतो. सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याची आजही कोणती प्रासंगिकता आहे. परिवर्तनाची प्रक्रिया पुढे नेण्याची जबाबदारी कोणाची आहे, असे प्रश्न हे नाटक प्रेक्षकांच्या मनात निर्माण करते.
शारदा राजकुमार बडोले निर्मित आणि गणेश कृ. मोडक सहनिर्मित या नाटकाला मंदार देशपांडे यांचे संगीत लाभले आहे. सुप्रिया बर्वे यांनी वेशभूषा, मिलिंद कोचरेकर यांनी रंगभूषा, तर सुशील पांचाळ आणि सहकाऱ्यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. नाटकात शशांक पांचाळ, मयुरेश मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलारे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुबोध हर्डीकर, सायली नंदा, मृणालिनी, योगेश गायकवाड, मृणाल खिस्मतराव आणि प्रेम जेटीथोर हे कलाकार विविध व्यक्तिरेखांतून ऐतिहासिक संघर्षाला रंगमंचावर जिवंत करणार आहेत.
मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रयोगांनंतर आता विदर्भात दाखल होणारे हे नाटक केवळ नाट्यरसिकांसाठीच नव्हे, तर इतिहास, सामाजिक परिवर्तन आणि समतेच्या विचारांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा रंगमंचीय उपक्रम आहे.ज्या पाण्याच्या घोटासाठी संघर्ष करावा लागला, त्याच पाण्याने स्वाभिमानाचा वणवा पेटवला! ज्या अन्यायाने माणसाला झुकवण्याचा प्रयत्न केला, त्याच अन्यायाविरुद्धच्या संघर्षाने समतेच्या इतिहासाला नवी दिशा दिली! त्या संघर्षाची आठवण, त्या वेदनांची जाणीव आणि त्या परिवर्तनाची प्रेरणा अनुभवण्यासाठी ‘पाण्याने पेटला वणवा’ हे नाटक विदर्भातील प्रेक्षकांसमोर येत आहे.
विदर्भ दौऱ्याचे वेळापत्रक
१५ ऑक्टोबर — चंद्रपूर
१६ ऑक्टोबर — नागपूर
१७ ऑक्टोबर — वर्धा
१८ ऑक्टोबर — गडचिरोली
१९ ऑक्टोबर — भंडारा
२१ ऑक्टोबर — यवतमाळ
२२ ऑक्टोबर — अमरावती
२३ ऑक्टोबर — बुलढाणा
२४ ऑक्टोबर — वाशिम
२५ ऑक्टोबर — अकोला
२७ ऑक्टोबर — गोंदिया
‘पाण्याने पेटला वणवा’ हे नाटक पाहणे म्हणजे समतेसाठी लढलेल्या संघर्षाच्या स्मृतींशी जोडले जाणे होय. इतिहासातील या परिवर्तनकारी पर्वाला रंगमंचावर अनुभवण्याची संधी विदर्भातील प्रेक्षकांना मिळणार आहे