हरारे,
Passing of Panch Sara Dambanevana झिम्बाब्वेच्या क्रिकेटविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. देशाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच सारा डॅम्बानेवाना यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाले. अनेक महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झिम्बाब्वे क्रिकेटने त्यांच्या निधनाची माहिती दिली. सारा २००९ ते २०१४ या कालावधीत झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचा भाग होत्या. खेळाडू म्हणून कारकीर्द घडवल्यानंतर त्यांनी पंचगिरीच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
सारांनी सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचगिरी करणाऱ्या त्या झिम्बाब्वेच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या महिला टी-२० विश्वचषकातही त्यांनी पंच म्हणून काम केले. या स्पर्धेत पंचगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या त्या पहिल्या महिला होत्या. याशिवाय, २०२५ मध्ये भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही त्यांनी पंचाची भूमिका बजावली. या स्पर्धेदरम्यान सर्व महिला सदस्यांचा समावेश असलेल्या पंचांच्या पॅनेलमध्येही त्या सहभागी होत्या. त्यांच्या या कामगिरीमुळे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेटमधील प्रतिनिधित्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली.
पंच म्हणून सारांनी एकूण ६३ वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जबाबदारी पार पाडली. यामध्ये ४२ महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामने, ११ महिला एकदिवसीय सामने आणि १० पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. पंचगिरी सुरू करण्यापूर्वीही त्यांनी झिम्बाब्वेच्या देशांतर्गत क्रिकेटच्या विकासासाठी योगदान दिले होते. २०११ च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतही त्या झिम्बाब्वेच्या संघाच्या सदस्य होत्या. २०२२ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पंच विकास पॅनेलमध्ये निवड झाली होती. खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच असा प्रवास करत त्यांनी झिम्बाब्वेच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने देशाच्या क्रिकेटविश्वाने अनुभवी खेळाडू आणि ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पंचाला गमावले आहे.