तुम्ही दहशतवादी आहात, इथे का आलात?

न्यूयॉर्कमध्ये मोहम्मद युनूस यांना विरोध

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
न्यूयॉर्क,
Protest against Muhammad Yunus बांगलादेशच्या माजी अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना न्यूयॉर्क विमानतळावर विरोधाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये युनूस व्हीलचेअरवर बसलेले दिसत असून, काही जण त्यांच्याजवळ येऊन घोषणाबाजी करताना दिसतात. यावेळी एका व्यक्तीने त्यांना ‘तुम्ही दहशतवादी आहात, इथे का आलात? परत जा,’ असे म्हटल्याचा आवाज व्हिडिओत ऐकू येतो. विरोध करणाऱ्यांनी बांगलादेशातील हजारो लोकांच्या मृत्यूला युनूस जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा, सुमारे दोन लाख लोकांना अटक करवून घेतल्याचा आणि लोकशाही नष्ट केल्याचा दावाही करण्यात आला. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
 
 
ork
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. अंतरिम सरकारमधून बाहेर पडल्यानंतर युनूस पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर होते. विमानतळावरील परिस्थिती पाहता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तातडीने बाहेर नेण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारात युनूस शांत राहून व्हीलचेअरवरून पुढे जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते, तर घोषणाबाजी करणारे लोक त्यांच्या मागे जाताना दिसतात. काही वृत्तांमध्ये विरोध करणाऱ्यांपैकी काही जण अवामी लीगशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची ओळख स्वतंत्रपणे निश्चित झालेली नाही. या घटनेवर युनूस किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. बांगलादेशातील न्यायालयाने २० लाख अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक रकमेच्या कथित अपहारप्रकरणी युनूस आणि अन्य १३ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले होते. ‘ग्रामीण टेलीकॉम’ या त्यांच्या ना-नफा संस्थेच्या कामगार कल्याण निधीतून सुमारे २० लाख अमेरिकी डॉलरचा अपहार केल्याचा आरोप अभियोजन पक्षाने केला होता. ढाका येथील विशेष न्यायाधीश सय्यद अराफात हुसेन यांनी आरोप रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिका फेटाळल्याचे वृत्तात म्हटले आहे. गरीब नागरिक, विशेषतः महिलांना मदत करण्यासाठी सूक्ष्म कर्जाची संकल्पना पुढे नेल्याबद्दल युनूस यांना २००६ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावत अधिकारी आपल्याला आणि सहकाऱ्यांना त्रास देत असल्याचा दावा केला होता. भ्रष्टाचारात सहभागी असल्याचेही त्यांनी नाकारले होते.