चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडल्याचा आरोप

शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :13-Oct-2026
Total Views |
पुणे
Pune School Case शहरातील घोरपडी परिसरातील एका नामांकित शाळेत तीन वर्षांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचा आणि त्याच्याशी क्रूर वर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर मुंढवा पोलिसांनी शाळेतील शिक्षिका मनिता आणि व्यवस्थापिका सोनाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
 


Pune School Case 3-Year-Old Boy Allegedly Locked in Bathroom, Case Filed 
घोरपडीतील बी. टी. कवडे रोडवरील संबंधित शाळेत ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी २.१५ या वेळेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुलाच्या आईने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५६ वाजता मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रणजित म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. सुरुवातीला प्रशासनाने फुटेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले; मात्र, त्यानंतर ते मिळू शकले नसल्याचे पोलिसांना कळवण्यात आल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आता शाळेतील डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केला आहे. हा डीव्हीआर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये घटनेशी संबंधित काही पुरावे आढळल्यास गुन्ह्यात अतिरिक्त कलमे समाविष्ट केली जाऊ शकतात, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या तांत्रिक तपासातून घटनेबाबत अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२) आणि ३(५), तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपांची सत्यता आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रकार समोर आल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या देखरेखीचा आणि बालकांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध करण्यात आलेले आरोप अद्याप तपासाधीन आहेत.